कोरोनामुळे डाळींंचे भाव शंभरी पार, नागरिकांच्या अडचणीत वाढ

tuar dal

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र नागरिकांना आवश्यक असणाऱ्या अत्यावश्यक सेवा सुरळीत राहतील असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे. असे असले तरी बाजारात भाजीपाल आणि अन्नधान्याचा तुटवडा होत असल्याचं दिसत आहे. अनेक ठिकाणी वाहतूक बंद असल्याने मालाचे ट्रक बाजारपेठांमध्ये पोहचत नसल्याने बाजार पेठांमध्ये गहू, ज्वारी, डाळी यांची कमी जाणवत आहे. मालाची आवक कमी असल्याने उपलब्ध धान्यांचा भाव गगनला भिडला आहे.

गेल्या आठवड्यात किरकोळ मार्केट मध्ये 28 ते 30 रूपये दराने विकला जाणारा गहू आता 35 ते 40 रूपये दराने विकला जात आहे.  ज्वारी 45 ते 50 वरून 50 ते 60 रूपये किलो दराने विकली जात आहे.  तूरडाळ 80 ते 100 रूपयांवरून 100 ते 130 रूपये किलो झाली आहे. मुगडाळ 80 ते 100 रूपयांवरून 100 ते 130 रूपये, मसूर डाळ 60  ते 80 रूपयांवरून 80 ते 100 रूपये झाली आहे.  नागरिकांकडून मागणी वाढल्याने दुकानदार मनमानीपणे दर लावत आहेत.  किरकोळ मार्केट मधील बाजारभावावर शासनाचे कसलेही नियंत्रण राहिलेले नाही.  कोरोनामुळे घाबललेले नागरिक मिळेल त्या दराने साहित्य खरेदी करून ठेवत आहेत.

दरम्यान अशा कठीण प्रसंगी व्यापाऱ्यांनी संवेदनशीलता दाखवून अन्न धान्य वाजवी दारात विकावे. उगाच महागाई वाढवू नये, असे आवाहन राज्य शासनाकडून करण्यात येत आहे. तर दुसरीकडे जवळपास एक आठवड्यापासून  बाजार समितीमधील धान्य मार्केट मधील व्यवहार ठप्प झाले होते. मार्केट अजून पूर्ण क्षमतेने सुरू झाले नाही.  यामुळे किरकोळ दुकानांमधील साहित्य ही संपत चालले असून अनेक दुकाने बंद झाली आहेत.