पुण्यातील मानाचा दुसरा गणपती : तांबडी जोगेश्वरी

पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे आपले वेग-वेगळे महत्व आणि त्यामागचा इतिहास देखील तेवढाच रंजक आहे. याच पाच मानाच्या गणपतींचा इतिहास आणि त्यांचे महत्व आपण ‘महाराष्ट्र देशाच्या’ माध्यमातून जाणून घेणार आहोत.

मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी
तांबडी जोगेश्वरी ही शहराची ग्रामदेवता आहे. हे मंदिर पुण्यातील पुरातन मंदिर असून या मंदिरातील देवीची मुर्ती स्वयंभू असल्याचे मानले जाते. तांबडी जोगेश्वरी गणेश मंडळाची सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा शंभर वर्षांहून अधिक जुनी आहे. तांबडी जोगेश्वरी गणपती हा मानाचा दुसरा गणपती. या गणपतीचे वैशिष्ट्य म्हणजे श्रींच्या मूर्तीचे दरवर्षी विसर्जन करण्यात येते आणि दरवर्षी पुन्हा नव्या मूर्तीची स्थापना करण्यात येते. सुरवातीच्या काळात तांबडी जोगेश्वरी मंदिराच्या आवारातच गणेशमुर्तीची स्थापना केली जात होती. परंतु गेल्या काही वर्षांपासून मंदिराच्या बाहेर भव्य मंडपात गणेश मूर्तीची स्थापना करण्यात येते.

या बाप्पाची मूर्ती पाहिली तर आफ्रिकन हत्तीचा चेहरा असणारी हि एकमेव मूर्ती आहे. ३३ इंच उंच आणि २६ इंच रुंद अशी हि मूर्ती आहे. या मूर्तीची आगमनाची मिरवणूक रथातून तर विसर्जनाची मिरवणूक पालखीतून काढण्यात येते, गेल्या चार पिढ्यांपासून दत्तात्रय कुलुंजकर यांचे कुटुंब गणेशाची मूर्ती साकारत होते. मात्र गेल्या तीन वर्षांपासून हि मूर्ती गिरे कुटुंब बनवत आहे.

तांबडी जोगेश्वरी मंदिराची स्थापना १५४५ रोजी त्रिंबक बेंद्रे यांच्या हस्ते करण्यात आली आणि त्यानंतर तांबडी जोगेश्वरी ही पुण्याची ग्राम देवता म्हणून ओळखली जाऊ लागली, लोकमान्य टिळकांनी सर्व समाज एकत्र यावा या उद्देशाने गणेश उत्सवाची सुरुवात केली आणि या उत्सवात तांबडी जोगेश्वरीला मनाचे दुसरे स्थान मिळाले,

तांबडी जोगेश्वरी बाप्पांचा देव्हारा आधी पितळेचा होता आणि काही काळानंतर मंडळाच्या सभासदांनी दिलेल्या देणगीतून चांदीचा देव्हारा बनवला आहे, सामाजिक उपक्रमात या मंडळाचा सहभाग अग्रगण्य राहिला आहे. १९९३ मध्ये जेव्हा लातूर जिल्ह्यातील किल्लारी गावात भूकंप झाला होता, तेव्हा तेथील लोकांना जीवनावश्यक वस्तू मंडळातर्फे दिल्या गेल्या होत्या,

 

You might also like
Comments
Loading...