कर्नाटकात राष्ट्रपती राजवट हाच योग्य पर्याय होता – टी.एस. कृष्णमूर्ती

हैदराबाद : कर्नाटकात विधानसभा निवडणुकीनंतर कुठल्याच पक्षाला बहुमत प्राप्त झालेले नसल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करणे हाच योग्य पर्याय होता, असे मत माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी.एस. कृष्णमूर्ती यांनी व्यक्त केले आहे. ते एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

नुकत्याच पार पडलेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत एकही पक्षला बहुमत मिळाले नाही. भाजप १०४ जागांवर विजय मिळवून सर्वात मोठा पक्ष ठरला मात्र कॉंग्रेसने जेडीएसला पाठींबा दिल्याने भाजपला सत्तेपासून दूर राहावे लागले. या पार्श्वभूमीवर बोलताना कर्नाटकात राष्ट्रपती राजवट हाच योग्य पर्याय होता असं मत टी.एस. कृष्णमूर्ती यांनी व्यक्त केल आहे.

ते यावेळी बोलताना म्हणाले की, भाजप, काँग्रेस व जनता दल (धर्मनिरपेक्ष) या पक्षांना बहुमताचा आकडा गाठता आला नाही त्यामुळे राज्यपाल वजुभाई वाला यांनी तीन महिन्यांसाठी राष्ट्रपती राजवट लागू करायला हवी होती. या काळात सरकार स्थापन झाले नसते तर त्यांनी नव्याने निवडणुकांची शिफारस करायला हवी होती. राष्ट्रपती राजवट हा यावरचा उपाय आहे असे मला म्हणायचे नाही, पण यात वेळ, पैसा यांचा अपव्यय, सौदेबाजी, खात्यांची आमिषे दाखवणे हे सगळे प्रकार टाळता आले असते.

ज्याला जास्त मते मिळाली त्याला विजयी जाहीर करण्याची पद्धत बंद केली पाहिजे. त्याला ‘फर्स्ट पास्ट द पोस्ट इलेक्शन सिस्टीम’ म्हणतात. या पद्धतीमुळे २०-२५ टक्के मते मिळवणारे उमेदवार विजयी होतात. ही पद्धत बंद केली नाही, तर जात, वंश, भाषा हे मुद्दे यात राहतील. राजकीय पक्षांना त्यांच्या मतांच्या प्रमाणात जागा द्याव्यात. तसे करायचे नसेल तर जिंकणाऱ्या उमेदवाराला ३३.३३ टक्के मते मिळाली पाहिजेत, असा नियम करावा म्हणजे मतदारसंघाशी त्यांची एकनिष्ठता राहील असही ते म्हणाले.