सातव्या विश्व मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी डॉ. तात्याराव लहाने

पुणे : इंडोनेशियातील बाली येथे १० सप्टेंबर रोजी होणा-या सातव्या मराठी साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती स्वागताध्यक्ष निलेश गायकवाड यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

गायकवाड म्हणाले की, ‘वैद्यक क्षेत्राशी संबंधित लेखन आणि लेखन व्यवहार’ हा यंदाच्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचा विषय आहे.

वैद्यक, आरोग्य, सार्वजनिक आरोग्य, औषधे निर्माण करणा-या कंपन्या, वैद्यकीय व्यवसायातील इष्ट आणि अपप्रवृत्ती या बाबतचे भ्रम, डॉक्टर आणि रोग्यांचे संबंध, डॉक्टर आणि औषध कंपन्यांचे संबंध, संबंधित कायदे, नियम आणि अधिकार अशा विविध बाबतीत सतत लेखन, विचार, चर्चा होणार असून, त्याची व्यापक दखल या निमित्ताने घेतली जाणार आहे.

तसेच संमेलनातील परिसंवादांमध्ये मराठी माध्यमातील नामवंतांप्रमाणे बाली येथील ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक, कलावंत आणि लेखक सहभागी होणार आहेत.