रुग्णवाहिकेसाठी थेट राष्ट्रपतींच्या ताफ्याला ब्रेक

एका रुग्ण वाहिकेसाठी ट्रॅफिक पोलिसांनी नेत्याच्या ताफा अडवल्याची जाहिरात आपण रोजच टीव्हीवर पाहतो. मात्र आपल्या देशात हे होणं अशक्य असल्याची उपरोधिक टीका ही आपण करतो. मात्र, बंगळुरूमध्ये एक अशी घटना घडलीय ज्यामुळे राष्ट्रपतींचा ताफाच थांबवण्यात आला.

नुकतच बंगळुरुमध्ये ड्युटीवर असलेल्या एका वाहतूक अधिकाऱ्याने  रुग्णवाहिकेसाठी थेट राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या गाड्यांचा ताफा अडवला. या घटनेमुळे वाहतूक पोलीस अधिकाऱ्याच्या या कृतीचे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक  होत असून माणुसकी जपणाऱ्या वाहतूक पोलीस अधिकाऱ्याची सध्या जोरदार चर्चा आहे.

नेमकं काय झाल!
मेट्रो ग्रीनच्या उद्घाटनासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी शनिवारी बंगळुरुत आले होते. यावेळी ट्रिनिटी सर्कल परिसरातून राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या वाहनांचा ताफा निघाला होता. त्याच दरम्यान  वाहूतक पोलिसात उपनिरीक्षक असणारे एम. एल. निजलिंगाप्पा ट्रिनिटी सर्कलवर कर्तव्य बजावत होते.  यावेळी निजलिंगाप्पा यांना राष्ट्रपतींच्या वाहनांचा ताफा येत असल्याची माहिती मिळाली. राष्ट्रपतींचा ताफा त्यावेळी राज भवनाकडे जात होता. मात्र तेवढ्यात निजलिंगाप्पा यांना एक रुग्णवाहिका गर्दीतून वाट काढण्याचा प्रयत्न करताना दिसली. यानंतर निजलिंगाप्पा यांनी रुग्णवाहिकेला गर्दीतून जागा करुन दिली. त्यामुळे रुग्णवाहिका लवकर जवळच्या एका खासगी रुग्णालयात पोहोचली. रुग्णालयातील रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी निजलिंगाप्पा यांनी राष्ट्रपतींचा ताफा काही वेळासाठी थांबवला. रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी देशाच्या देशाच्या सर्वोच्च पदावरील व्यक्तीच्या वाहनाचा ताफा अडवण्याचे धैर्य निजलिंगाप्पा यांनी दाखवल आहे.