मराठा समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करू नका:कुंजीर

मुंबईतील मराठा क्रांती मोर्चाची तयारी अंतिम टप्प्यात

पुणे : मराठा समाजासाठी आरक्षणासहित विविध प्रलंबित मागण्यासांठी सकल मराठा समाजातर्फे गेले काही महिने राज्यात विविध ठिकाणी मराठा मूक क्रांती मोर्चे काढण्यात आले होते. याच मालिकेतील शेवटचा महामोर्चा मुंबई येथे 9 ऑगस्ट रोजी होणार आहे. केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर हरियाना आणि गुजरात राज्यातूनही मराठा बांधव या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे, अशी माहिती मोर्चाचे संयोजक शांताराम कुंजीर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
कुंजीर म्हणाले, “मराठा समाजातर्फे वारंवार मागण्या करूनही त्यांच्या प्रश्‍नांकडे शासन दुर्लक्ष करत आहे. यामुळे समाजामध्ये असंतोषाची भावना निर्माण होत आहे. मात्र शासनाने मराठा समाजाच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे यासाठी या राज्यव्यापी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा जिजामाता उद्यान येथून सकाळी अकरा वाजता निघणार आहे. इतर मोर्चांप्रमाणेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन या मोर्चाची सांगता होईल. आतापर्यंत पाळण्यात आलेली शिस्त व संयम या मोर्चामध्येही कायम राहणार आहे.” मुंबई मधील मोर्चा हा मूक मोर्चा असेल. मात्र यानंतरदेखील शासनाकडून आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास पुढील काळात उग्र स्वरूपाचे मोर्चे काढण्यात येतील असा इशारादेखील त्यांनी यावेळी दिला.