बीड जिल्ह्यात प्रेमीयुगुलाची गळफास घेऊन आत्महत्या

suicide

बीड : मजुरीसाठी गेलेल्या तरुणाचे एका महिलेसोबत प्रेमसंबंध जुळल्यावर या महिलेला घेऊन हा तरुण तीन महिन्यांपूर्वी गावी आला होता. दोघेही एकत्रित पती-पत्नीप्रमाणे राहिल्यानंतर आधी प्रेयसी महिलेने, त्यानंतर प्रियकर तरुणाने राहत्या घरातील लोखंडी आडूला स्कार्फने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना केज तालुक्यातील उत्तरेश्वर पिंपरी येथे उघडकीस आली.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तरेश्वर पिंपरी येथील आकाश शिवाजी धेंडे हा तरुण त्याच्या आईवडिलांसह कोल्हापूर येथे रामनगर भागात वास्तव्यास होता. तो कोल्हापूरमध्ये मजुरी करीत असताना घराशेजारी राहत असलेल्या सावित्री या २८ वर्षीय विधवा महिलेसोबत त्याचे प्रेमसंबंध जुळले. सावित्रीला पहिल्या पतीपासून दोन मुले आहेत. तीन महिन्यांपूर्वी हे प्रेमीयुगुल उत्तरेश्वर पिंपरी या गावी येऊन आकाश धेंडे याच्या घरी राहत होते.

मंगळवारी दुपारी आकाश हा काही कामानिमित्त घराबाहेर गेला होता. त्याच वेळी सावित्रीने घरातील लोखंडी आडूस स्कार्फने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर मंगळवारी रात्रीच आकाशने गळफास घेऊन जीवन संपवले. बुधवारी सकाळी केज ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक श्रीराम काळे व बीट अंमलदार अमोल गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिले. केज येथील उपजिल्हा रुग्णालयात डॉ. घुले यांनी दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन केले. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. केज पोलिस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

महत्वाच्या बातम्या

IMP