‘प्रीती शर्मा मेनन यांचा हास्यास्पद आरोप, त्यांनी आधी मराठी शिकावे आणि कायदाही समजून घ्यावा’

preeti sharma

मुंबई – एका संपादकाने विचारलेल्या प्रश्नाला प्रमाण मानून आम आदम पक्षाच्या नेत्या प्रीती शर्मा मेनन यांनी भारतीय जनता पार्टीच्या राज्य सरकारवर छगन भुजबळ यांना जामीन मिळवून दिल्याचा हास्यास्पद आरोप केला आहे. त्यांनी आधी मराठी शिकावे आणि कायदाही समजून घ्यावा, असे प्रत्युत्तर भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी सोमवारी दिले.

माधव भांडारी म्हणाले की, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या कामगिरीवरून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. त्याचा समाचार घेताना भाजपा प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांत  पाटील यांनी भुजबळ यांना आठवण करून दिली की, भुजबळ अजूनही जामीनावरच असून त्यांची खटल्यातून मुक्तता व्हायची आहे.

या राजकीय टोलेबाजीच्या संदर्भात एका वृत्तवाहिनीच्या संपादकाने विचारले असता प्रदेशाध्यक्षांना त्यांना माहिती दिली की, जामीनावर सुटण्यापूर्वी भुजबळ यांचे पुतणे सगळीकडे सुटकेसाठी याचना करत होते आणि आपल्या मंत्र्याच्या बंगल्यावरही सतत येत होते. त्यावर संबंधित संपादकाने, ‘त्यांचा पुतण्या बंगल्यावर येऊन बसायचा म्हणून त्यांना जामीन मिळाला का ? असा प्रश्न विचारला. आता हा प्रश्नच प्रमाण मानून प्रीती शर्मा मेनन यांनी फडणवीस सरकारने छगन भुजबळ यांना जामीन मिळवून दिला अशी कबुली दिल्याचा हास्यास्पद दावा केला आहे.

माधव भांडारी यांनी सांगितले की, आपण जामीन मिळवून दिला असे प्रदेशाध्यक्षांनी कोठेही म्हटले नाही. जामीन मिळण्यापूर्वी भुजबळ कुटुंब कसे वागत होते आणि जामीनानंतर कसा बदल झाला एवढेच त्यांनी दाखवून दिले. भुजबळ यांच्यावरील न्यायालयीन कारवाईत हस्तक्षेपाचा प्रश्नच निर्माण होत नाही. केवळ संपादकाने विचारलेला प्रश्न ही जर प्रीती शर्मा मेनन यांना कबुली वाटत असेल तर त्यांनी आधी मराठी भाषा शिकावी आणि सोबत न्यायप्रक्रियेचाही अभ्यास करावा.

महत्त्वाच्या बातम्या