लोकसभेत प्रितम मुंडेंचा धडाका सुरूच… आता ‘हा’ प्रश्न लागणार मार्गी

टीम महाराष्ट्र देशा : बारा ज्योतिर्लिंग पैकी पाचवे ज्योतिर्लिंगअसलेल्या परळी येथील रेल्वे स्थानकाचा समावेश रेल्वे च्या धार्मिकपर्यटन मंडळामध्ये करावा अशी मागणी खा.डॉ.प्रितम मुंडे यांनी आज संसदेत मातृभाषा मराठीमध्ये प्रश्न विचारत केली.

आज संसदेत प्रश्नोंत्तराच्या तासात बोलताना बीड जिल्ह्याच्या जिव्हाळ्याचा असलेला व ४० वर्षांपासून प्रलंबित राहिलेला नगर-बीड-परळी रेल्वे प्रश्न प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात जलदगतीने मार्गी लागत असल्याने खा.डॉ.प्रितम मुंडे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व रेल्वेमंत्री पियुष गोयल यांचे आभार व्यक्त केले.

देशातील लोकांना धार्मिक पर्यटन रेल्वेने करता यावे याकरिता रेल्वे मंत्रालयातर्फे धार्मिक पर्यटन सर्किट तयार करून नवीन रेल्वेगाड्या सुरु केल्या जाणार आहेत या धार्मिक पर्यटन सर्किट मध्ये बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या परळी रेल्वे स्थानकाचा समावेश करावा अशी मागणी करत नवीन रेल्वे धोरणांप्रमाणे सरकार रेल्वेचे खासगीकरण करणार आहे, त्यामध्ये पॅसेंजर गाड्यांबाबत परवानगी देणार आहे का असा प्रश्न यावेळी खा.डॉ.प्रितम मुंडे यांनी उपस्थित केला. यावेळी रेल्वे राज्यमंत्री नामदार सुरेश जी अंगडी यांनी चांगला आणि महत्वाचा प्रश्न विचारल्यामुळे खा.डॉ.प्रितम मुंडे यांचे कौतुक केले.

खा.डॉ.प्रितम मुंडे यांनी विचारलेल्या प्रश्नांला उत्तर देताना रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी म्हणाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व रेल्वेमंत्री पियुष गोयल हे रेल्वे प्रवाश्यांना चांगल्या सोयी सुविधा मिळाव्यात म्हणून प्रयत्न करत आहेत. त्यासाठी सरकार ५० लाख कोटी खर्चाचे नियोजन करत आहे. यासाठी काही गाड्या खाजगीकरणातून जोडल्या जाणार आहेत ,व जर लोकांनी कमी खर्चात चांगल्या सोयी सुविधा मिळणार असतील तर खाजगीकरणाचा आधार घेतला पाहिजे. देशाला एक चांगले पर्यटन स्थळ बनवायचे आहे त्यासाठी काही चाचण्या घेतल्या जात आहेत असे त्यांनी सांगितले.

यावेळी उपप्रश्न विचारत खा.डॉ. प्रितम मुंडे यांनी रेल्वे धार्मिकपर्यटन मंडळ मध्ये परळी-वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्राचा समावेश करावा अशी मागणी केली. त्यासोबतच ज्याप्रमाणे विमानतळ हे खाजगीकरणातून अत्याधुनिक केले जात आहेत त्याच अनुषंगाने खाजगी कंपन्यांमार्फत रेल्वे स्थानकांचे अत्याधुनिक करणार आहेत का असा उपप्रश्न यावेळी मांडला.

संसदेच्या या अधिवेशनामध्ये खा.डॉ.प्रितम मुंडे यांनी मतदारसंघातील प्रश्नांसह सामाजिक, कृषी ,शैक्षणिक अशा विविध विषयांवर अभ्यासूपणे प्रश्न मांडत सरकारचे लक्ष वेधल्याचे दिसून आले आहे.