प्रवीण तोगडिया यांची विहिंपच्या आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष पदावरून उचलबांगडी ?

नवी दिल्ली: विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांना पदावरुन हटवण्यात येणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. काहीदिवसांपूर्वी तोगडिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. तेव्हापासूनच तोगडिया यांना पदावरुन हटवण्याच्या चर्चेला वेग आला होता.

सूत्रांच्या माहिती नुसार तब्बल ५२ वर्षानंतर प्रथमच विहिंपमध्ये अध्यक्ष निवडण्यासाठी निवडणूक होणार असून १४ एप्रिलला विहिंपच्या कार्यकारी बोर्डाची बैठक होणार आहे. तोगडिया आणि विहिंपचे अध्यक्ष राघव रेड्डी यांची पदावरून उचलबांगडी करण्यात येणार आहे. या दोन्ही पदावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांची निवड करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

प्रवीण तोगडिया यांनी उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद जिल्ह्यात विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना मोदी सरकारवर निशाणा साधला होता. श्री रामाच्या नावाचा वापर करत भाजपने लोकांची फसवणूक केल्याचा तोगडिया म्हणाले होते.