fbpx

प्रवीण गायकवाड यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश, पुण्यातून उमेदवारीसाठी पुन्हा नाव चर्चेत

पुणे: संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी आज अखेर कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईमध्ये आयोजित कॉंग्रेस नेत्यांच्या बैठकीत गायकवाड यांनी प्रवेश केला. यावेळी राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि इतर नेते उपस्थित होते. दरम्यान, आता गायकवाड यांना पुण्यातून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे.

मागील एक महिन्यापासून प्रवीण गायकवाड हे कॉंग्रेस प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या, मात्र गायकवाड यांना पक्षात प्रवेश देण्यास आणि उमेदवारीसाठी देखील स्थानिक कॉंग्रेस नेत्यांकडून विरोध करण्यात आला होता. त्यामुळे त्यांचा पक्षप्रवेश लांबला होता. तर कॉंग्रेसला अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला प्रवेश देण्यासाठी वेळ आहे, मात्र २५ वर्षापासून सामाजिक काम करणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्यासाठी वेळ नसल्याची टीका गायकवाड यांनी केली होती. तसेच आपण कॉंग्रेसकडे केलेली उमेदवारीची मागणी मागे घेत असल्याचं देखील ते म्हणाले होते.

आज गायकवाड यांचा कॉंग्रेस प्रवेश झाल्याने पुन्हा एकदा त्यांना लोकसभा उमेदवारी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर स्थानिक कॉंग्रेस नेते काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.