प्रवीण गायकवाड कॉंग्रेसमध्ये,निष्ठावंतांच्या भूमिकेकडे पुण्याचे लक्ष

blank

मुंबई : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आणि शेकापचे नेते प्रवीण गायकवाड यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. गायकवाड यांचा मुंबईमध्ये मल्लिकार्जुन खर्गे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश झाला.

पुणे लोकसभेसाठी कॉंग्रेसचा उमेदवार ठरत नसल्याचे मोठा पेच निर्माण झाला आहे. गायकवाड हे स्पर्धेत होते. मात्र, त्यांच्या नावाला स्थानिक निष्ठावंतांनी विरोध केल्याने गायकवाड यांनीच, मला आता कॉंग्रेसचे तिकीट नको, अशी भूमिका घेतली होती.

कधीकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या पुण्यात लोकसभेसाठी उमेदवार देण्यावरून पक्षात मोठी मतभिन्नता होती. काँग्रेसचे महापालिका गटनेते अरविंद शिंदे , प्रवीण गायकवाड,महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,माजी आमदार मोहन जोशी,भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे,हर्षवर्धन पाटील यांच्या नावाची देखील चर्चा होती. आता गायकवाड यांचे नाव पुन्हा चर्चेत आल्याने पुण्यातील निष्ठावंत आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

दरम्यान,दोन दिवसांपूर्वी गायकवाड यांनी कॉंग्रेसच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली होती. कॉंग्रेसकडे अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांच्या प्रवेशासाठी वेळ आहे. पण, गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना ताटकळत ठेवून त्यांची अवहेलना केली जाते, अशा शब्दांत गायकवाड यांनी निशाणा साधला होता. त्यामुळे या पक्षात ते आता कसं जुळवून घेतात हे येत्या काही काळात स्पष्ट होईल.