कुर्बानी ने कोरोना जाणार का ? दरेकरांचा शरद पवारांना सवाल

pawar darekar

मुंबई : महाराष्ट्रात लॉकडाऊनमध्ये झालेले अनेक सण सर्वांनी अत्यंत साधेपणाने साजरे केले आहे. रमजान ईदसुद्धा मुस्लिम बांधवानी साजरी केली होती. परंतु, बकरी ईदसाठी बकऱ्यांची कुर्बानी देण्यावरून सर्वांमध्ये मतमतांतर आहे. कारण, बकरी ईद साजरी करण्यासाठी त्यांना बकऱ्याची कुर्बानी देणे भाग आहे. यावर उपाय केला जाऊ शकतो का? तसेच यावर काय मार्गही काढता येईल का? यासंदर्भात राज्यात बकरी ईद साजरी होण्यापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अन्य नेत्यांसमवेत बैठक बोलावली होती. महत्वाचे म्हणजे बकरी ईद संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय निर्णय घेतील? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

या बैठकीत मुस्लिम नेत्यांनी शरद पवार यांच्याकडे आपली बाजू मांडली. त्यानंतर शरद पवार यांनी बैठकीतील नेत्यांना आपली बाजू मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपली बाजू मांडण्याची सूचना दिली, अशी माहिती समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी यांनी दिली आहे.

यावर आता विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ‘राम मंदिर बांधून कोरोना जाणार का? असं विचारणारे श. प. कुर्बानी साठी बैठक घेतात, मुख्यमंत्र्यांना मार्ग काढण्यास सुचना करतात.. कुर्बानी ने कोरोना जाणार म्हणजे’ अस ट्विट करत दरेकर यांनी पवारांवर हल्लाबोल केला आहे.

दरम्यान, राम मंदिर भूमीपूजनावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. कोणत्या गोष्टीला महत्व द्यायचं हे ठरवलं पाहिजे. आम्हाला वाटतं की कोरोना संपवला पाहिजे आणि काही लोकांना वाटतं की मंदिर बांधून कोरोना जाईल. लॉकडाऊनमुळे लोकांचं आर्थिक नुकसान होत आहे त्याकडे राज्य, केंद्र सरकारने लक्ष दिलं पाहिजे. आमचे सहकारी खासदार आहेत ते दिल्लीत जाऊन प्रश्न मांडतील, असं शरद पवारांनी म्हटलं.