महाविकास आघाडीची पत्रकार परिषद म्हणजे फुसका बार; दरेकरांचा हल्लाबोल

darekar

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारने राज्याला कशी मदत केली, याची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. फडणवीसांनी दिलेल्या आकडेवारीला उत्तर देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या वतीने अनिल परब, जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात यांनी काल पत्रकार परिषद घेतली आणि फडणवीसांच्या पत्रकार परिषदेचा पंचनामा केला.

याच पार्श्वभूमीवर ‘विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये जे वस्तुस्थितीपर मुद्दे मांडले ते खोडून काढण्यासाठी राज्यातील तीन मंत्र्यांना पत्रकार परिषद घ्यावी लागली. पण ही पत्रकार परिषद म्हणजे फुसका बार ठरला आणि महाविकास आघाडीची पत्रकार परिषद बिघाडी झाली,’ अशी टीका भाजपा नेते आणि विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केली.

तसेच ‘सरकार अस्थिर करण्याचे तुमच्याच मनाचे खेळ आहेत, अशा परिस्थितीत कोणीही सरकार अस्थिर करत नाही. याबाबत देवेंद्र फडणवीस यांनीही यापूर्वीही स्पष्ट केलं आहे,’ असं दरेकर यांनी सांगितलं.

दरम्यान, भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. ‘महाविकास आघाडीची समस्या आम्ही समजू शकतो. त्यांच्याकडे दोनच पर्याय आहेत अकार्यक्षमतेमुळे आम्ही राज्याला विनाशाच्या खाईत लोटले असल्याचे मान्य करणे किंवा रेटून खोटे बोलणे. पहिला पर्याय स्वीकारण्या इतका प्रामाणिकपणा नाही, त्यामुळे खोटारडेपणा सुरू आहे,’ अशी टीका त्यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

पंडित नेहरुंनी रचलेल्या भक्कम पायावरच आधुनिक भारताच्या विकासाचा उंच मनोरा – अजित पवार

लॉकडाऊन शिथिल करताना विषाणूचा पाठलाग अधिक गांभीर्याने करा – उद्धव ठाकरे

तुमच्यात हिम्मत असेल तर सरकार पाडून दाखवाच, सेनेच्या वाघाने फोडली डरकाळी