या सरकारने शिक्षणाचा बट्याबोळ केला आहे ; प्रवीण दरेकर यांची घणाघाती टीका

pravin darekar

उस्मानाबाद : या सरकारने शिक्षणाचा बट्याबोळ केला आहे. त्यामुळे शिक्षण व्यवस्थेचे तीन-तेरा वाजले आहेत असा मार्मिक टोला विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी काल लगावला.

विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार शिरिष बोराळकर यांच्या प्रचारार्थ उस्मानाबाद दौ-यावर आले होते. यावेळी भाजपचे आमदार रणजितसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष नितिनि काळे उपस्थित होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की,

शिक्षण विभागाची प्रत्येक विषयात धरसोड वृत्ती आहे. शिक्षण क्षेत्रातील कोणत्याही घटकाला विश्वासात न घेता निर्णय घ्यायचा व त्यावर टिका झाली की तो मागे घेण्याचे काम शिक्षण मंत्री करित असल्याचे स्पष्ट करताना ते म्हणाले की, सोमवारपासून राज्यातील शाळा सुरु करण्याचा निर्णय आधी घेतला व तो आता फिरविला. स्थानिक प्रशासन निर्णय घेतील असे शिक्षण मंत्र्यांनी जाहिर केले. जे महाराष्ट्रात सत्तेवर आहेत, त्यांचीच सत्ता मुंबई व ठाणे महापालिकेत आहेत, मग त्या भागातील ३१ डिसेंबर पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला जातो. मग उस्मानाबद, बीड, हिंगोली येथील विद्यार्थी व शिक्षकांना कोरोनाची लागण होण्याची भीती नाही का..त्यांच्याबद्दल वेगळा न्याय का..त्यामुळे या सरकारच्या निर्णयात कुठेही एक वाक्यता नाही, विसंवाद आहे, बिघडलेल्या अवस्थेत हे सरकार असल्याची टिकाही दरेकर यांनी केली.

उस्मानाबद मधील श्रीपतराव हायस्कूल मध्ये आज ४८ -५० शिक्षकांना कोरोना ची लागण झाली आहे, मग उद्या येथील विद्यार्थ्यांना कोरोना झाला तर त्याला कोण जबाबदार आहे. एका बाजूला तुम्ही सांगता कोरोनाची लाट येण्याची भीती आहे आणि एका बाजूला शाळा उघडण्याचा निर्णय घेण्यात येतो. हा सरकारमध्ये विरोधाभास असल्याची टिकाही त्यांनी केली.

ऊर्जामंत्र्यांनी १०० युनिट वीज मोफत देण्याची घोषणा केली पण त्यावरुन सोयीस्कररित्या यु-टर्न घेतले.  आता वीज बिलात सवलती देणार असे सांगून वीज ग्राहकांच्या जखमेवर मिठ चोळण्याचा प्रकार सरकार करित आहे. उर्जामंत्र्यांना अधिकार आहेत, मुख्यमंत्र्यांशी बोलून ते वीज बिल कमी करण्यासंदर्भात निर्णय घेऊ शकतात. केवळ आपली जबाबदारी झटकण्याचे काम उर्जामंत्री करित असल्याची टिकाही त्यांनी यावेळी केली.

औरंगाबाद विभाग (मराठवाडा) पदवीधर मतदारसंघात भाजपने शिरीष बोराळकर यांच्या रूपाने एक अष्टपैलू उमेदवार दिलेला आहे.सामाजिक कार्यात त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. सध्याचे पदवीधर आमदार व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी सत्तेत असताना देखील मराठवाड्याच्या पदवीधरांना न्याय मिळवून दिला नाही. सतीश चव्हाण यांची १२ वर्षांची कारकिर्द निष्क्रिय गेलेली आहे, असे मतही यावेळी त्यांनी व्यक्त केले.भाजपा सरकारच्या काळात मराठवाडाला विकासाचे स्वप्न देवेंद्रजी फडणवीस यांनी दाखविले. मराठवाडा येथील मोठा प्रश्न असलेल्या वॉटर ग्रिड प्रकल्पाला देवेंद्रजी यांच्या काळात मंजुरी देण्यात आली. या भागातील रस्त्यांची कामे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या प्रयत्नांनी करण्यात आली. मराठवाड्यात विकासाची कामे भाजप सरकारच्या काळात करण्यात आल्याचेही दरेकर यांनी स्पष्ट केले.

महत्वाच्या बातम्या