कॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सेना आणि भाजपमध्ये इनकमिंग सुरूच आहे. कॉंग्रेसचे युवा नेते डॉ.सुजय विखे पाटील यांच्यानंतर काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. मुंबई महानगरपालिकेतील काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते प्रवीण छेडांनी भाजपामध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.

भाजपमध्ये नगरसेवक म्हणून कारकिर्द गाजवल्यानंतर प्रकाश मेहतांशी असलेल्या वादातून २०१२ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. २०१२ मध्ये मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसच्या तिकीटावर नगरसेवक म्हणून ते निवडून आले होते. महापालिकेत विरोधी पक्षनेते पदही त्यांनी भुषवले आहे. अभ्यासू नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे. २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीत प्रकाश मेहतांकडून त्यांचा पराभव झाला होता.

प्रवीण छेडा यांना भाजपकडून लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. २०१७ मध्ये पालिका निवडणुकीत भाजपचे पराग शहांनी त्यांना पराभूत केले होते. प्रकाश मेहतांना शह देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्यांना भाजपमध्ये घेतल्याचे बोललं जातं आहे.