शेळकेंच्या मताधिक्याचे उदाहरण देणाऱ्या पवारांना दरेकरांनी करून दिली नातवाच्या पराभवाची आठवण

शेळकेंच्या मताधिक्याचे उदाहरण देणाऱ्या पवारांना दरेकरांनी करून दिली नातवाच्या पराभवाची आठवण

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लखीमपूर हिंसाचाराची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पवारांना मावळ गोळीबाराची आठवण करुन दिली.फडणवीस यांनी थेट मर्मावर बोट ठेवल्याने राष्ट्रवादीची चांगलीच गोची झाली आहे. दरम्यान, आज खासदार शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत मावळ गोळीबार प्रकरणावर भाष्य करत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

पवार यांनी आज फडणवीसांना उत्तर देताना मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराला तब्बल 90 हजाराचं मताधिक्य मिळाल्याचं सांगितलं. तर आता विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी लोकसभा निवडणुकीत शरद पवारांचे नातू पार्थ पवार पिछाडीवर होते याची आठवण करुन दिली. सुनील शेळके हे स्वतः आगोदरपासून त्या मतदार संघात काम करत होते आणि तिकीट न मिळाल्याने राष्ट्रवादीत गेले. शेळके राष्ट्रवादीतून निवडून आले हे सांगताना सुनील शेळके हे आगोदर भाजपमध्ये होते हे मात्र पवारांनी सांगायचं नेहमीप्रमाणे टाळले.

आज पत्रकार परिषदेत मावळचा गोळीबार पोलिसांनी केला होता. शेतकऱ्यांच्या मृत्यूला राजकीय पक्षाचे नेते जबाबदार नव्हते असं पवारांनी सांगितलं. त्याचबरोबर मावळमध्ये आता चित्र बदललं आहे. लोकांना वस्तुस्थिती कळाली आहे. माझ्या जिल्ह्यातील तालुका असल्यामुळे सांगत, मावळ तालुक्यात सातत्यानं जनसंघ, नंतर भाजप होतं. रामभाऊ म्हाळगी हे नेहमी मावळचे प्रतिनिधी होते, असंही पवार म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले, मावळमध्ये लोकांना भडकावण्याचं काम कुणी केलं हे लक्षात आल्यानंतर त्या मावळमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. सुनील शेळके हे 90 हजाराच्या फरकानं निवडून आले आहेत. मावळमध्ये संताप असता तर एवढ्या फरकानं राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला नसता. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मावळची स्थिती समजून घेतली तर त्यांच्या ज्ञानात भर पडेल असं पवार म्हणाले.

दरम्यान पवारांच्या या टीकेला आता विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. पार्थ पवार लोकसभा निवडणुकीत उभे असताना मावळमधून पिछाडीवर होते, अशी आठवण दरेकरांनी पवारांना करुन दिली आहे. तसंच मावळात भाजपला जनाधार किती हे परत एकदा बघा, असं आव्हानही दरेकरांनी दिलंय.

महत्वाच्या बातम्या