प्रवीण दरेकरांनी वाचला मुंबईतील रुग्णांच्या समस्यांचा पाढा

pravin drekar

मुंबई : कोरोनाच्या रुग्णांची हेळसांड होऊ नये व त्यांना उपचारासाठी रुग्णालये उपलब्ध होण्याच्या दृष्टीने डॅशबोर्ड तयार करण्याची आग्रही मागणी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यानुसार मुंबई महापालिकेने तयार केलेल्या डॅशबोर्डची पाहणी आज विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केली. पालिकेच्या वरिष्ठ अधिका-यांकडून या डॅशबोर्डच्या कार्यप्रणालीची सविस्तर माहितीही दरेकर यांनी जाणून घेतली. तसेच ही यंत्रणा अधिक सक्षमपणे कार्यान्वित होऊन सामान्य नागरिकांनापर्यंत या डॅशबोर्डची माहिती पोहचविण्यात यावी अश्या सूचना विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी यावेळी दिल्या.

कोरोनोची स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी युध्दपातळीवर उपाययोजना करावी अशी आग्रही मागणी प्रवीण दरेकर यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्तांकडे केली. मुंबईचे अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी व अतिरिक्त आयुक्त संजय जयस्वाल यांची भेट घेऊन भाजपाच्यावतीने आयुक्तांच्या नावे त्यांना सविस्तर निवेदन सादर केले. तसेच त्यांच्या समवेत मुंबईतील कोरोनाच्या स्थितीबद्दल चर्चा केली. यावेळी आमदार प्रसाद लाड, आमदार राहुल नार्वेकर मुंबई महानगरपालिकेचे भाजपचे गट नेते प्रभाकर शिंदे, नगरसेवक भालचंद्र शिरसाट उपस्थित होते. दरम्यान महानगरपालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षाला भेट देऊन तेथील कोरोनो संदर्भातील कामाचा आढावा घेतला.

अडकून पडलेल्या महाराष्ट्रातील भूमिपुत्रांना घरी जाण्यासाठी विशेष बसेसची व्यवस्था करा

यानंतर प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना दरेकर यांनी सांगतिले की, राज्यातील रुग्णांची हेळसांड होऊ नये यासाठी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी डॅशबोर्ड निर्माण करण्याची मागणी केली होती. काही रुग्णालयांमध्ये खाटा उपलब्ध होत नसल्याने रुग्ण एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात जातात. तिकडे देखील खाटा उपलब्ध नसल्याने तिसऱ्या रुग्णालयाच्या शोधात फिरतात. यामुळे त्यांची हेळसांड होते व ते मृत्युमुखी पडतात. या मागणीची गांभीर्यपूर्वक दखल घेऊन मुंबई महानगरपालिकेने डॅशबोर्ड तयार केला आहे. हा डॅशबोर्ड कशाप्रकारे काम करतो हे समजणे आवश्यक आहे. कारण, जर तयार झालेल्या डॅशबोर्डची अंमलबजावणी मुंबईतील रुग्णालयांमध्ये खाटा उपलब्ध आहेत किंवा नाही याची माहिती मिळविण्यासाठी झाली नाही तर ही केवळ एक तांत्रिक उभारणी होईल. डॅशबॉर्ड नीट तयार झाले असेल तर ५० टक्के रुग्णांवरील दबाव आणि तणाव दूर होऊन त्यांची कमी हेळसांड होईल. म्हणून महानगरपालिकेने तयार केलेल्या डॅशबॉर्डची आपण पाहणी केली असून परळ येथील महानगरपालिका कार्यालयातील डॅशबॉर्डचीही पाहणी करणार असल्याचे दरेकर यांनी सांगितले.

मुंबईमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या समस्या अधिक गंभीर होत असून या रुग्णांना बेड्सचा तुटवडा, विलगीकरण केंद्रातील अस्वच्छता, ऑक्सीजन सिलेंडरची व व्हेंटीलेटरची कमतरता जाणवत आहे, अतिदक्षता विभात अपुऱ्या खाटा तसेच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नालेसफाई न झाल्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे महापालिकेने आता या गंभीर संकटाकडे लक्ष द्यावे व कोरोनोची स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी युध्दपातळीवर उपाययोजना करावी अशी आग्रही मागणी प्रवीण दरेकर यांनी मुंबईचे महानगरपालिकेकडे केली.

कोरोनाच्या संकटातून एकजुटीतून महाराष्ट्राला बाहेर काढू – मुख्यमंत्री ठाकरे

दरेकर यांनी सांगतिले की, मुंबई महानगरपालिका आयुक्तांकडे पत्र देण्यात आले असून महाराष्ट्रासह मुंबईमध्ये गेल्या ८० दिवसांपासून कोरोनाचे संकट घोंगावत आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये हे संकट खुप गडद झाले असून सद्यस्थितीत एकट्या मुंबईमध्ये २५,००० पेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत. ही रुग्णसंख्या कमी न होता दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी सर्वसामान्य मुंबईकरांमध्ये भातीचे वातावरण निर्माण झाले आहे. येणारा पावसाळा लक्षात घेता, कोरोनाबाधितांची संख्या मोठया प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सामान्य मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी यावर तातडीने मार्ग काढण्याची आवश्यकता आहे.

सध्याच्या समस्यांकडे लक्ष वेधताना श्री.दरेकर यांनी सांगितले की,मुंबई मध्ये वाढती रुग्णसंख्या व रुग्णालयातील उपलब्ध बेडस् यामध्ये तफावत आहे. मुंबई मनपाअंतर्गत अंदाजे ६,००० खाटांची व्यवस्था आहे. परंतु रुग्णसंख्या २५,००० घरात आहे. त्यामुळे कोरानाबाधित रुग्णांना खाटा उपलब्ध नाहीत. सामान्य गोरगरीब मुंबईकर जनतेकडे घरी राहून, स्वतंत्र खोलीमध्ये उपचार घेण्याची सोय नाही. परिणामी कोरोनाबाधितांचा संसर्ग इतर मुंबईकरांना होत आहे.ही परिस्थिती लक्षात घेता, सामान्य मुंबईकरांसाठी नव्याने वाढीव खाटा उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. तसेच मुंबईमध्येही सद्यस्थितीत मोठया प्रमाणात स्थलांतर होत असून मुंबईत देखील काही स्थलांतरित नागरीक आलेले आहेत. ते कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरीकांना विलग (क्वारंटाईन) ठेवण्यात येते. परंतु या क्वारंटाईन सेंटरमध्ये मुलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामध्ये पुरेसे स्वच्छ पिण्याचे पाणी, शौचालय उपलब्ध नसल्याने विलगिकरण केंद्रात स्वच्छतेचा अभाव आहे. या सर्व विलगिकरण केंद्रांमध्ये किमान मुलभूत सुविधा पुरविण्याची आवश्यकता असल्याचेही दरेकर यांनी स्पष्ट केले.

कोरोना नियंत्रणात अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र मागे,ठोस उपापययोजनांची आवश्यकता

कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनच्या पुरवठयाची गरज असून येणाऱ्या काळात रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, किती ऑक्सिजन सिलेंडर लागतील, याचा अंदाज घेऊन त्याची तयारी मोठया प्रमाणात करणे गरजेचे आहे. तरी या प्रकरणी लक्ष घालून योग्य कार्यवाही करण्याची आवश्यकता असल्याचे सांगून दरेकर म्हणाले की, मुंबईमध्ये आजपर्यंत १००० पेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यु कोरोनामुळे झाला आहे. परंतु ही संख्या आणखी वाढू नये, याकरीता गंभीर रुग्णांना व्हेंटीलेटरची सुविधा पुरविणे गरजेचे आहे. परंतु सद्यस्थितीत व्हेंटीलेटरची संख्या मर्यादीत आहे. त्यामुळे आणखी व्हेंटीलेटर वाढविण्यात यावेत व अति दक्षता विभाग ( ICU) खाटांची संख्या देखील वाढविण्याची मागणी दरेकर यांनी आयुक्तांकडे केली आहे.

खाजगी रुग्णालयातील परिचारीकांनी संपावर जाण्याचा इशारा दिला असून त्यामुळे, कोरोनाबाधितांची देखभाल व त्यांना आरोग्यसुविधा पुरवितांना रुग्णालय प्रशासनाची तारांबळ उडणार आहे. ही परिस्थिती तातडीने नियंत्रित करुन परिचारीकांना संपावर जाण्यापासून परावृत्त करण्याची आवश्यकता आहे असेही त्यांनी सांगितले.

मुंबईमधील रुग्णांना बेडस् अपुऱ्या पडत आहेतच, परंतु त्याचबरोबर वाढत्या मृत्युमुळे आता शवागृहेही भरली आहेत. केईएम रुग्णालयातील शवागृह भरल्याने रुग्णालय प्रशासनाने मृतदेह कॉरीडॉरमध्ये ठेवले. सायन व केईएम रुग्णालयामध्ये मृतदेहाशेजारी रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे व्हीडीओ समाज माध्यमांवर यापुर्वीच मोठया प्रमाणात व्हायरल झाला होता. ही परिस्थिती खुप गंभीर आहे. या प्रकरणी पालिकेने तातडीने लक्ष घालण्याची मागणीही दरेकर यांनी यावेळी केली.

१०,००० अतिरिक्त बेडस् मुंबईमध्ये उपलब्ध करुन देण्यात येत असले तरीही याकरीता डॉक्टर, परिचारिका तसेच कोरोनाच्या उपचारासाठी आवश्यक यंत्रणा यांची पुरेशी संख्या असणे आवश्यक आहे. आधीच मनुष्यबळाची कमतरता असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असून या बाबतीत तज्ञ मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी महापालिकेमार्फत प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे दरेकर यांनी स्पष्ट केले.

पावसाळा जवळ येत असून मलेरिया, डेंग्यु सारखे साथीचे आजार मोठया प्रमाणात वाढू शकतात. परंतु सद्यस्थितीत नालेसफाईचे काम व्यवस्थित झालेले नाही. परिणामी इतरही रोगराई पसरण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन तातडीने नालेसफाई करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सुचना देण्यात याव्यात असे सांगतानाच दरेकर म्हणाले की, झोपडपट्टयांमध्ये पावसाळयाच्या पार्श्वभुमीवर अधिक प्रमाणात सॅनिटायझेशन करण्याची आवश्यकता आहे, अन्यथा कोरोनाचा प्रसार पावसाळयात झोपडपट्टींमध्ये वाढू शकतो. तरी मुंबईतील सर्व झोपडपट्टयांमध्ये राहणाऱ्या गोरगरीबांचे आरोग्याचे हित लक्षात घेता झोपडपट्टयांमध्ये सॅनिटायझेशनचे प्रमाण वाढविण्यात यावेत अशी मागणी दरेकर यांनी केली.