प्रशांत परिचारक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा! शिवसेना आक्रमक

shivasena vr prashant paricharak1shivasena vr prashant paricharak1

मुंबई: भाजप आमदार प्रशांत परिचारक यांनी गेल्या वर्षी पंढरपूर येथे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीदरम्यान सैनिकांच्या पत्नीविषयी अपमानास्पद उद्गार काढले होते. त्यामुळे त्यांना दीड वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं होतं. त्यानंतर चौकशीसाठी समिती नियुक्ती करण्यात आली होती. चौकशी समितीने प्रशांत परिचारक यांचं निलंबन मागे घ्यावं, अशी शिफारस अहवालात केली  होती. हा ठराव सभागृहात मंजूर करण्यात आला होता. दरम्यान, प्रशांत परिचारक याचं निलंबन मागे घेण्याच्या निर्णयाला शिवसेनेने तीव्र विरोध केला आहे.

भाजपाचे सह्योगी आमदार प्रशांत परिचारक यांच्याविरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे. परिचारक यांना कायमस्वरुपी बडतर्फ करावे, अशी मागणी शिवसेना आमदारांनी लावून धरली. आमदारांच्या गदारोळामुळे सोमवारी विधानसभेचे कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर शिवसेना आमदार याविरोधात आक्रमक झाले आहेत. परिचारक यांचे निलंबन मागे घेतले यासारखी शरमेची बाब नाही. परिचारक यांना विधिमंडळाच्या आवारात पायसुद्धा टाकू देऊ नका, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले होते.

शिवसेना आमदारांनी विधानसभेत आक्रमक भूमिका घेतली. परिचारक यांच्यासारख्या लोकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, त्यांना कायमस्वरुपी बडतर्फ करावे, अशी मागणी शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी केली. विधान भवन पायऱ्यांवर शिवसेना आमदारांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली.

काय आहे प्रकरण?

महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये प्रशांत परिचारक यांची सभा होती. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील भोसेमध्ये उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत, विरोधकांवर टीका करण्याच्या नादात भाजप पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांनी सीमेवर लढणाऱ्या जवानांचा घोर अपमान केला होता.
“पंजाबमधील सैनिक एकदाही घरी न येता वर्षभर सीमेवर लढत असतो आणि त्याला फोन येतो तुला मुलगा झाला. त्या आनंदात तो पेढे वाटतो. राजकारणही तसंच आहे, ” असं वादग्रस्त वक्तव्य परिचारक यांनी केलं होतं.