या कारणांमुळे प्रशांत गायकवाड यांच्यावरील अविश्वास ठराव बारगळला..!!

पारनेर/स्वप्नील भालेराव  :  बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांच्यावर आणण्यात आलेल्या अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी सहाय्यक निबंधक सुखदेव सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी ११ वाजता बोलविण्यात आलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीस सभापती प्रशांत गायकवाड यांच्या व्यतिरिक्त एकही संचालक उपस्थित न राहिल्यामुळे गायकवाड यांच्यावरील अविश्वास ठराव बारगळला आहे.

झावरे व गायकवाड गटात संचालकांच्या पळवापळवीच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. गायकवाड यांच्यासह सहाय्यक निबंधक सूर्यवंशी, सहकार अधिकारी सुनील शेलुकर, प्रभारी सचिव शिवाजी पानसरे, तसेच कर्मचारी राजू चेडे हेच सभागृहात उपस्थित होते. पंधरा मिनिटे वाट पाहूनही एकही संचालक उपस्थित न राहिल्याने बैठकीचे अध्यक्ष सूर्यवंशी यांनी इतिवृत्तात नोंद केली. ठराव बारगळल्याचे जाहीर करून बैठक संपल्याचे जाहीर केले.

यावेळी माध्यमांशी बोलताना प्रशांत गायकवाड म्हटले की, राजकारण हे बाहेर कमिटी च्या आत राजकारणाला थारा नाही. तसेच आम्ही 18 संचालक मिळून नक्कीच हिताची कामे करू व करणार आहोत. तसेच अविश्वास ठराव प्रकरणावर जास्त काही बोलत नाही तर प्रत्येक माणसाने जर एकमेकांशी गोड बोललं तर माणसं जवळ येतात अन्यथा पाठ फीरवतात. असे सुचक वक्तव्य बाजार समिती सभापती प्रशांत गायकवाड यांनी केले तसेच तालुक्यातील सर्व कार्यकत्यांचे आभारही मानले.