नगर दक्षिणमध्ये पुन्हा १९९१ ची पुनरावृत्ती ; गडाख-विखेंमध्ये होणार हाय व्होल्टेज लढाई ?

टीम महाराष्ट्र देशा : नगर दक्षिणेत राष्ट्रवादीकडून प्रशांत गडाख यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉ.सुजय विखे हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत त्यामुळे नगर दक्षिणमध्ये राष्ट्रवादीकडून प्रशांत गडाख यांनाच उमेदवारी मिळेल अशी शक्यता निर्माण झाली आहे.

जर प्रशांत गडाख यांना उमेदवारी मिळाली, तर विखे विरुद्ध गडाख लढाईची पुनरावृत्ती पाहायला मिळू शकते. कारण यशवंतराव गडाखांनी १९९१ च्या लोकसभा निवडणुकीत स्वर्गीय बाळासाहेब विखेंचा पराभव केला होता. 1991 च्या लोकसभा निवडणुकीत विखे गडाख खटला देशभरात गाजला होता.

त्यानंतर शरद पवार आणि विखे पाटील घराण्यात हा वाद निर्माण झाला. जर सुजय विखेंनी इथे लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर केली आणि राष्ट्रवादीने प्रशांत गडाख यांना उमेदवारी दिली तर हा वाद आणखी उफाळून येणार यात शंका नाही.

काय आहे विखे गडाख वाद ?

१९९१ ची लोकसभा निवडणूकत बाळासाहेब विखे पाटील आणि शरद पवार यांच्यातील वाद अगदीच विकोपाला गेला. कॉंग्रेसकडून या जागेवर सरळ दावा होता त्याकाळचे मातब्बर नेते बाळासाहेब विखे यांचा. मात्र अस बोलल जात शरद पवार यांनी त्यावेळी विखेंच तिकीट कापण्यात आपल सगळ राजकीय वजन वापरलं.आणि कॉंग्रेसकडून उमेदवारी दिली सोनईच्या यशवंतराव गडाख यांना.त्यामुळे बाळासाहेब विखे यांनी अपक्ष निवडणूक लढवली. अहमदनगर मतदारसंघात यशवंतराव गडाख हे काँग्रेसचे उमेदवार होते. तर बाळासाहेब विखे पाटील यांना उमेदवारी न मिळाल्यानं ते गडाखांविरुद्ध अपक्ष लढले. पण यशवंतराव गडाख हे अटीतटीच्या लढतीतून निवडून आले.

त्यानंतर बाळासाहेब विखे-पाटील यांनी निवडणुकीच्या काळात शरद पवार आणि यशवंतराव गडाखांनी त्यांचं चारित्र्यहनन केलं, असा आरोप करत न्यायालयात खटला दाखल केला.

शरद पवार आणि यशवंतराव गडाख यांच्याविरोधात बाळासाहेब विखे पाटील यांनी कोर्टात पुरावे सादर केले. हा खटला सर्वोच्च न्यायालयापर्यंत गाजला. या खटल्यादरम्यान शरद पवार यांच्यावरही कोर्टाने ठपका ठेवला तर गडाखांना सहा वर्षं निवडणुकीपासून वंचित राहावं लागलं.

“निवडणुकीत भाषण करताना उत्तरेतील जित्राबं दक्षिणेत येतील… पैसे देतील, सायकल देतील (विखे पाटील यांचं निवडणूक चिन्ह सायकल होतं) ते घ्या पण मतं कॉंग्रेसच्याच उमेदवाराला द्या, असं वक्तव्य शरद पवारांनी केलं होतं. त्यावरून आचारसंहिता भंग झाला. तसंच बदनामी केली या आरोपांचा खटला विखे यांनी गडाख आणि शरद पवार यांच्यावर केला. त्यावेळी कोर्टाने गडाख यांना ६ वर्षांसाठी निवडणूक बंदी घातली होती, तर शरद पवार यांच्यावर ठपका ठेवून नोटीस काढली.

अस बोलल जात गडाख – विखे खटल्यानेच देशाला निवडणुकीत आचारसंहिता दिली. त्यामुळे विखेंची तिसरी पिढी गडाखांच्या दुसऱ्या पिढीला कशी उत्तर देणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. त्यामुळे जर नगर दक्षिण मध्ये प्रशांत गडाख विरुद्ध सुजय विखे अशी लढत झाली तर मात्र राज्याच्या राजकारणातील सर्वात हाय व्होल्टेज लढत ठरणार आहे.