विठ्ठलाचे प्रसादाचे लाडू पाच रुपयांनी झाले महाग

Prasad Laddu costlier by five rupees

सोलापूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने १ जानेवारीपासून बुंदी लाडू प्रसादाच्या किमतीमध्ये पाच रुपयांनी वाढ केली आहे. यापूर्वी दहा रुपयांना मिळणाऱ्या बुंदी लाडू पॅकेटची किंमत आता पंधरा रुपये असेल. लाडू प्रसाद किंमतवाढीबाबत मंदिर समिती प्रशासनाकडे विचारणा केली असता लाडू बनवण्याचे काम देण्यासाठी समितीकडून निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती.

या प्रक्रियेमध्ये ज्यांची निविदा मंजूर झाली आहे, त्या खासगी संस्थेला हे काम दिले आहे. याबरोबरच पूर्वीपेक्षा लाडूचे वजनदेखील वाढवण्यात आले आहे. त्यामुळे साहजिकच किंमत वाढल्याचे सांगण्यात आले.श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून काही वर्षांपासून भाविकांसाठी ना नफा ना तोटा तत्त्वावर अल्पदरात विक्री करण्याचा उपक्रम हाती घेतला होता.

आषाढी, कार्तिकी यात्रेच्या वेळी लाखोंच्या संख्येने येणाऱ्या सर्वसामान्य भाविकांना लाडू प्रसाद विकत घेता यावा, असा त्यामागे उद्देश होता. दरम्यान, मंदिर समिती लाडू प्रसादासह दैनंदिन अन्नछत्रातील पदार्थ एफडीएच्या नियमांचे पालन करून बनवले जातील, असे सूतोवाच मध्यंतरी डॉ.अतुल भोसले यांनी केले होते. त्यामुळे काही उपक्रमांचे आऊटसोर्सिंग करण्याची त्यांनी तयारी दर्शवली होती.

त्याचाच एक भाग म्हणून लाडू बनवण्याचे काम खासगी तत्त्वावर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी समितीने लाडू बनवण्यासाठी निविदा मागवल्या. त्यामधून येथील एका खासगी संस्थेला लाडू बनवण्याचा ठेका देण्यात आला आहे.Loading…
Loading...