अकोल्यावरुन आलेल्या माणसाचं आपल्या इथं काय काम? : प्रणिती शिंदे

प्रणिती शिंदे

टीम महाराष्ट्र देशा : सोलापूर लोकसभेचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. सर्वच नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. कॉंग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांनी अकोल्यावरुन आलेल्या माणसाचं आपल्या इथं काय काम? असं म्हणत प्रकाश आंबेडकरांवर टीकास्त्र सोडलं आहे.

“दुसरे तिसरे कोण ते, अकोल्यावरून आलेत. अकोल्यावरुन आलेल्या माणसाचं आपल्या येथे काय काम? तो येऊन आपल्याला शिकवेल, असं कर तसं कर अशा शब्दात प्रणिती शिंदे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर तोंडसुख घेतले. तसेच, “भाजपची बी टीम असलेल्या वंचित बहुजन आघाडीला फक्त सांगितलं गेलंय की, सोलापूरला जा आणि लावा, पेटवा.. बस्स. आणि आपण त्यांच्या मागे जाणार.” असा आरोपही प्रणिती शिंदे यांनी वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश आंबेडकर यांच्यावर केला आहे.

दरम्यान, सोलापूर मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे. भाजपतर्फे जयसिद्धेश्वर शिवाचार्य, कॉंग्रेसतर्फे सुशीलकुमार शिंदे व वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रकाश आंबेडकर मैदानात आहेत.