प्रणव मुखर्जींना काँग्रेसच्या इफ्तार पार्टीचे निमंत्रण नाही

pranab mukharji

नवी दिल्ली: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमामध्ये माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जीनी आपल्या भाषणामध्ये कॉंग्रेसची डोकेदुखी वाढवली नसली तरी, कॉंग्रेस त्यांच्यावर अद्यापही नाराज असल्याच दिसून येत आहे. या कारणामुळेच कॉंग्रेसच्या इफ्तार पार्टीचे निमंत्रण अजून पर्यंत मुखर्जींना पाठवले नाही. सूत्रांच्या माहितीनुसार या इफ्तार पार्टीला देशभरातील विरोधी पक्षांना बोलावले आहे.

नवी दिल्लीच्या ताज पॅलेस हॉटेलमध्ये १३ जूनला ही पार्टी होणार आहे. कॉंग्रेसद्वारे दोन वर्षानंतर या पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. मुखर्जी यांच्यासह माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही काँग्रेसने इफ्तार पार्टीसाठी निमंत्रित केलेले नाही. काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाकडून या इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रणव मुखर्जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ७ जूनला झालेल्या कार्याक्राममध्ये प्रमुख अथीती म्हणून उपस्थित राहिले होते. त्यावेळी काँग्रेससह विरोधी पक्षांनी प्रणवदांना संघाच्या व्यासपीठावर जाण्यास विरोध केला होता.