प्रकाश आंबेडकरांच्या विराट रॅलीने विरोधकांच्या उरात भरली धडकी

सोलापूर- ( प्रतिनिधी ) – सोलापूर तर सोडाच परंतु अमेठी आणि रायबरेलीतसुद्धा लक्ष घालू शकतो असा इशारा सोलापूर लोकसभेचे वंचित आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांना दिला आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुशीलकुमार शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये निवडणुकीवरून चांगलेच राजकारण पेटले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी दुपारी विरोधकांच्या उरात धडकी भरेल अशी विराट रॅली काढून जबरदस्त शक्ती प्रदर्शन केले. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आंबेडकर माध्यमाशी बोलत होते.

आंबेडकर म्हणाले, माजी केंद्रीय गृहमंत्री केवळ वय झाल्यामुळेच तोल गेल्याने असे आरोप करत आहेत. संविधानाचा आपण खून केल्याचा शिंदे यांचा आरोप हास्यास्पद आहे, शिंदे जेवढे आरोप करत राहतील तितके आपले मतदान वाढत जाणार आहे. लोकशाहीला हुकूमशाही करण्याची प्रवृत्ती वाढत आहे. प्रत्येक मतदारसंघ काहीजणांची राजेशाहीची सरदारकी झाली आहे. सरदारक्या संपून लोकशाही प्रस्थापित झाली पाहिजे असे आमचे मत आहे. सोलापूरच्या गिरणी आज बंद पडल्या आहेत. येथील राजकारण जमिनीभवती आहे. सोलापुरात टेक्सटाईल पार्क होणे गरजेचे आहे. त्यासाठी कोणतेही प्रयत्न झालेले नाहीत. टेक्सटाईलसाठीचा सुमारे २२ हजार कोटीचा व्यवसाय गुजरातमध्ये गेला आहे. शिंदे यांनी लक्ष घातले असते तर सोलापूरचे चांगले झाले असते, असा आरोपसुद्धा आंबेडकर यांनी केला.

दरम्यान सम्राट चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील बाबासाहेबांच्या पुतळ्यास अभिवादन करून मिरवणुकीला प्रारंभ झाला. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत उपराकार लक्ष्मण माने, सुजात आंबेडकर , एमआयएमचे शहराध्यक्ष तौफिक शेख आदी नेते होते. या मिरवणुकीत हजारो बांधव सहभागी झाले होते. मिरवणूक रॅली चार हुतात्मा पुतळा येथे आल्यानंतर प्रकाश आंबेडकर हे तौफिक शेख यांच्यासोबत दुचाकीवर बसून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रवाना झाले.