fbpx

आंबेनळी दुर्घटनेतून बचावलेल्या प्रकाश सावंत देसाई यांची बदली

टीम महाराष्ट्र देशा- आंबेनळी घाटात बस दुर्घटनेप्रकरणी एकमेव बचावलेले प्रकाश सावंत देसाई यांच्यावरून दापोलीत एकच संशयकल्लोळ उडाला आहे. त्यामुळे लोकांच्या भावना लक्षात घेऊन अपघातातून वाचलेले प्रकाश सावंत-देसाई यांची बदली करण्यात आली आहे. विद्यापीठ प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. दापोली कृषी विद्यापीठातून त्यांची रत्नागिरी येथील मत्स्य महाविद्यालयात बदली करण्यात आली आहे.

आंबेनळी दुर्घटनेने हादरला होता महाराष्ट्र

२८ जुलैला दापोली कृषी विद्यापीठाचे कर्मचारी, विद्यार्थी आणि चालक असे मिळून ३४ जण बसने दापोली येथून महाबळेश्वर येथे सहलीसाठी निघाले होते. आंबेनळी घाटात एका वळणावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस दरीत कोसळून ३३ जणांचा मृत्यू झाला. या भीषण अपघातातून प्रकाश सावंत हे आश्चर्यकारकरित्या बचावले होते.

प्रकाश सावंत यांच्यावर झाले होते गंभीर आरोप

अपघातानंतर सावंत यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियांमध्ये तफावत होती. त्यामुळे एवढ्या भीषण अपघातातून प्रकाश सावंत बचावले कसे, असा सवाल मृत्यू पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाइकांनी करत प्रकाश सावंत देसाई यांच्या चौकशीची मागणी केली होती. तसेच सामाजिक कार्यकर्ते संजय गुरव यांनीही मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे चौकशीची मागणी केली होती. यानंतर मृतांच्या नातेवाईकांनी प्रकाश सावंत देसाई यांच्याविरोधात मोर्चाही काढला होता.दरम्यान, दापोली कृषी विद्यापीठानेही आपला चौकशी अहवाल सादर करून प्रकाश सावंत देसाई यांना क्लीन चिट दिली होती.