एकदा मटका लागला म्हणजे काही होत नाही, जावडेकरांचा खा. काकडेंना टोला

पुणे : भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर केलेल्या टिकेनंतर भाजप नेत्यांकडून त्यांच्यावर निशाणा साधला जात आहे. शनिवारी पुणे भाजपने काकडेंचा निषेधाचे पत्रक काढले होते. तर आज केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी संजय काकडे यांच्यावर निशाणा साधला आहे.

मी कोणत्याही भाकितांवर बोलत नाही. मात्र काकडेंनी दानवे यांच्याबद्दल मांडलेल्या मतावर गोगावले यांनी कालच पत्रक काढलं आहे. पालिकेच्या वेळी जरी त्यांचं भाकीत खरं ठरलं मात्र एकदा मटका लागला म्हणजे काही होत नाही, म्हणत जवडेकर यांनी काकडेंना टोला लगावला आहे.

दोन दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पुणे लोकसभेची आढावा बैठक घेतली. यामध्ये शहरातील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. मात्र लोकसभेसाठी इच्छुक असणारे खा. काकडे यांना बैठकीतून डावलण्यात आले होते. त्यामुळे नाराज झालेल्या काकडे यांनी थेट दानवे यांच्यावरच तोफ डागली होती.

आम्ही लोकसभा निवडणुकीत शिवसेनेशी युती न केल्यास भाजपला मोठा फटका बसेल. ४८ पैकी ४० मतदारसंघ तर सोडाच पण भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना स्वत:च्या मतदारसंघातही जिंकता येणार नाही. त्यांचा दीड-दोन लाखांच्या मताधिक्याने पराभव झाला नाही तर मी राजकारणातून संन्यास घेईन, असे वक्तव्य संजय काकडे यांनी शुक्रवारी केले आहे. यावरूनच आता काकडे यांच्या विरोधात भाजपमधून सुरु उमटतात दिसत आहेत.

पुणे भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी काकडेंच्या वक्तव्याचा निषेध करत निवेदन प्रसिद्ध केले आहे. यामध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्याबद्दल खासदार संजय काकडे यांनी केलेल्या वक्तव्याचा पुणे शहर भारतीय जनता पार्टी, पक्षाचे एक खासदार, आठ आमदार व महापालिकेतील ९६ नगरसेवकांच्या वतीने निषेध नोंदवत असल्याचं म्हंटल आहे.