पूजा सकटचा मृत्यू संशयास्पद,पोलिसांनी निष्पक्ष तपास करावा : प्रकाश आंबेडकर

prakash-ambedkar 06

पुणे : कोरेगाव भीमा येथील पूजा सकट या मुलीचा मृतदेह रविवारी विहिरीत आढळल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. १ जानेवारीला येथे दंगल झाली होती. दंगलीच्या वेळी घर पेटवण्याच्या प्रकाराचा संदर्भ या घटनेशी लावण्यात येत आहे.माझ्या मुलीने आत्महत्या केली नसून तिचा खून करून मृतदेह विहिरीत टाकून देण्यात आला, असा दावा मुलीच्या वडिलांनी केला आहे. दरम्यान पूजा सकटचा मृत्यू संशयास्पद आहे. कोरेगाव-भीमा प्रकरणात पूजा एकमेव तक्रारदार होती. पोलिसांनी आधीच तिच्या एफआयआरवर तपास केलेला नाही. आता तिच्या मृत्यूप्रकरणी तरी पोलिसांनी निष्पक्ष तपास करावा, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

पुण्यातील कोरेगाव भीमामध्ये 1 जानेवारीला हिंसाचार झाला होता. जाळपोळ आणि दगडफेकही झाली होती. या हिंसाचारात पूजा सकटचं घर जाळण्यात आलं होतं. हिंसाचाराच्या त्या घटनेची पूजा साक्षीदार होती.घर जाळल्यानंतर पूजाचं कुटुंब कोरेगाव-भीमापासून जवळच असलेल्या वाडा नावाच्या गावात राहायला गेलं. मात्र वाडा गावात ज्या ठिकाणी हे कुटुंब राहत होतं, तिथल्या जमीन मालकाने काही दिवसांमध्येच घर सोडण्यासाठी तिच्या कुटुंबाच्या मागे तगादा लावला.पूजा शनिवारी घरातून नाहीशी झाली. रविवारी तिचा मृतदेह वाडा गावातील एका विहिरीत आढळून आला.

पूजाचे वडील सुरेश सकट याचं काय म्हणणे आहे ?
माझे कुटुंब १५ वर्षांपासून भीमा कोरेगावमधील पीडब्ल्यूडीच्या जागेत राहत आहे. माझ्या घराशेजारचा प्लॉट एकाला विकत घ्यायचा आहे. मात्र माझ्या पत्र्याच्या शेडमुळे त्या जागेची किंमत कमी होत असल्याने घर खाली करण्याबाबत काही दिवसांपासून मला धमकी देण्यात येत आहे. त्याबाबत मी १८ नोव्हेंबर २०१७ रोजी कोल्हापूर पोलीस महानिरीक्षकांकडे तक्रार देखील केली होती.
१ जानेवारीला येथे दंगल झाली होती. त्याच्या दुसऱ्या दिवशी माझे घर जाळण्यात आले. त्यामागे घर खाली करण्याची धमकी देणाºयांचा हात होता. मी आतापर्यंत चार वेळा तक्रार दिली आहे. नुकताच पुरवणी जबाब देखील दिला होता. त्यातूनच त्यांनी माझ्या मुलीचा खून केला.