fbpx

माजी आरपीआय कार्यकर्त्याला प्रकाश आंबेडकरांच्या समर्थकांनी हंटरने केली बेदम मारहाण

टीम महाराष्ट्र देशा : फेसबुकवरून भरीप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यावर एका व्यक्तीने वादग्रस्त पोस्ट टाकून टीका केली होती. या टीका करणाऱ्या इसमाला बाळासाहेब आंबेडकरांच्या समर्थकांनी हंटरने बेदम मारहाण केली. तसेच मारहाण करत अंबाजोगाई पोलिस स्टेशनपर्यंत त्याची धिंड काढली. या लाईव्ह मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ही घटना मंगळवारी सायंकाळी अंबाजोगाई शहरात घडली. मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव महेंद्र निकाळजे असे आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला नसल्याचे कळते आहे.

3 फेब्रुवारी रोजी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची मुंबईत जाहीर सभा आहे. याच सभेला समाज बांधवांना आवाहन करण्यासाठी महेंद्र निकाळजे या कार्यकर्त्याने एक सोशल मीडियात व्हिडीओ तयार केला होता. समाजाला आवाहन करण्यासोबतच भारिप नेते प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यावर अपशब्द वापरले होते.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रकाश आंबेडकरांच्या समर्थकांनी महेंद्र निकाळजे या कार्यकर्त्याला अंबाजोगाई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बेदम चोप दिला. एवढेच नाही तर या व्यक्तीची रस्त्याने धिंड काढत त्याला अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली.

महेंद्र निकाळजे हा एलआयसी एजंट होता. शिवाय त्याने काही वर्षे आरपीआय गटात देखील कार्य केले आहे. सध्या तो कुठल्याही पक्षात काम करत नाही.