‘लॉकडाऊनचा निर्णय मागे घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही’

prakash ambedkar

पुणे : राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोना रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात शनिवारी व रविवारी संपूर्ण लॉकडाऊन म्हणजेच वीकेंड लॉकडाऊन करण्यात आला असून सोमवारी रात्री आठ वाजल्यापासून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत रात्रीची संचारबंदी असेल. तर, दिवसभर जमावबंदी असेल.

राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केल्यानंतर राज्यभरातील सामान्य जनतेसह व्यापाऱ्यांनी देखील मोठ्या प्रमाणात विरोध केला आहे. यामुळे आता यात बदल केला जावा अशी मागणी विविध नेते करत आहेत. ३० एप्रिल पर्यंत अत्यावश्यक व जीवनावश्यक (किराणा, औषधे, डेअरी, आदी) दुकाने वगळता इतर दुकाने बंद ठेवायला लावल्याने हा विकेंड नाही तर आठवड्याच्या सातही दिवस लॉकडाऊनची स्थिती असल्याची टीका विरोधी नेत्यांनी केली आहे.

आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देखील पुण्यात पत्रकार परिषद घेऊन कडक निर्बंधांना विरोध दर्शवला आहे. ‘राज्यातील नागरिक या लॉकडाऊनला विरोध करत आहेत. लॉकडाऊनच्या काळात राज्य सरकार कोणतीही मदत करायला तयार नाही. लोकांमधील रोष उफाळून येण्याआधी राज्य सरकारने लॉकडाऊनचा निर्णय परत घ्यावा. अन्यथा लोक स्वतःच दुकाने सुरु करायला लागतील. त्याला आम्ही देखील पाठींबा देऊ. आम्हाला अटक करायची असेल तर करा. पण आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही,’ असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या