… तर लोकसभेच्या सर्व जागा लढवणार – प्रकाश आंबेडकर

अकोला : वंचित समाजाला गेल्या ६८ वर्षात न्याय मिळाला नाही. त्यामुळे त्यांच्या मनात तीव्र असंतोष खदखदतो आहे. सत्तेत गेल्याशिवाय प्रश्न सुटणार नाहीत याची जाणीव वंचितांना व्हायला लागली आहे.महाराष्ट्रात आम्ही दोन अधिवेशन घेतल्यानंतर वंचित बहुजन आघाडी स्थापन केली असून धर्मनिरपेक्ष विचारांसोबत निवडणुक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

काँग्रेसला आम्ही १२ जागांचा प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावावर काँग्रेसकडून अद्यापही सकारात्मक प्रतिसाद आला नाही भविष्यात तो न आल्यास महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघात आम्ही उमेदवार उभे करू अशी घोषणा भारिप-बमसंचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केली.ते अकोल्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, वंचित समाज सत्तेत जाऊ शकला नाही. त्यांना सत्तेत प्रतिनिधित्व मिळू शकले नाही. या समाजाचा आतापर्यंत वापर करण्यात आला आता वंचीत समाज जागा झाला आहे. वंचित समाजाला गेल्या ६८ वर्षात न्याय मिळाला नाही. त्यामुळे त्यांच्या मनात तीव्र असंतोष खदखदतो आहे. सत्तेत गेल्याशिवाय प्रश्न सुटणार नाहीत याची जाणीव वंचितांना व्हायला लागली. सर्वच सत्ता पक्षांनी वापर केला असल्याची जाणीव त्यांना झाली आहे आणि म्हणून महाराष्ट्रातील वंचित बहुजनांची मुठ बांधून सत्ता संपादनाचा निर्धार आम्ही केला आहे.