‘प्रकाश आंबेडकर बाबासाहेबांचे विचार संपवत आहेत’

टीम महाराष्ट्र देशा : पीआरपीचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ‘रिपब्लिकन’ हा राजकीय विचार संपविण्याचा प्रयत्न प्रकाश आंबेडकरांकडून होत आहे असं कवाडे म्हणाले आहेत. तसेच त्यांनी वंचित बहुजन आघाडीवरही जोरदार टीका केली.

बुलढाणा येथील पत्रकार परिषदेत बोलताना कवाडे यांनी ‘आंबेडकरांनी वंचित आघाडी तयार केली मात्र त्यात रिपाइला कुठेच स्थान नसल्याचही त्यांनी सांगितलं. याचा प्रत्यय लोकसभा निवडणुकीत स्पष्टपणे दिसून आला. त्यांना जर रिपाइचे विचार वाढवायचे असते तर त्यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्या समोर उमेदवार उभा केला नसता असंही कवाडे म्हणाले.

पुढे बोलताना ‘भाजपचं वंचितला चालवित असल्याची शक्यताही त्यांनी यावेळी व्यक्त केली. सध्या आम्ही महाआघाडीचा घटक आहोत, त्यानुसार आगामी विधानसभा निवडणुकी संदर्भात काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर जागा वाटपाची चर्चा झाली आहे. मात्र आमचा सन्मान केला गेला नाही, तर मात्र आम्ही स्वबळावर राज्यात ५१ जागा लढवू’ असंही कवाडे म्हणाले.

दरम्यान, यापूर्वीही अनेकदा प्रकाश आंबेडकरांवर बाबासाहेंचे विचार संपवत आहेत असे आरोप झाले होते. तसेच वंचित आघाडी ही भाजपची बी टीम असल्याचंही अनेकदा म्हटले होते. परंतु आंबेडकरांनी हे सर्व आरोप खोडून काढले होते.