fbpx

प्रकाश आंबेडकरांमुळे महाराष्ट्र पेटला- संभाजी भिडे गुरुजी

sambhaji bhide vr prakash aambedkar

सांगली: पुण्यातील शनिवारवाड्यासमोर झालेल्या एल्गार परिषद ही भीमा-कोरेगाव दंगलीस कारणीभूत आहे. प्रकाश आंबेडकरांमुळे महाराष्ट्र पेटला, असा आरोप शिवप्रतिष्ठानचे संस्थापक आणि कोरेगाव-भीमाच्या दंगलीत सहभाग असल्याचा आरोप असलेले संभाजी भिडे गुरुजी यांनी केला.

कोरेगाव-भीमा दंगलीसाठी गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवाणी, माजी न्यायमूर्ती बी जी कोळसेपाटील, उमर खालीद, आणि प्रकाश आंबेडकर यांची वक्तव्य कारणीभूत आहेत. आधी या सर्वांना अटक करायला हवी, अशी मागणी संभाजी भिडे यांनी केली.

भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी २६ मार्चपर्यंत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांना अटक करा, नाहीतर मुंबईत मोर्चा काढू, असा निर्वाणीचा इशारा सरकारला दिला आहे. यावर संभाजी भिडे म्हणाले, मला अटक करण्याची प्रकाश आंबेडकरांची मागणी आणि विधानसभेला घेराव घालण्याचं वक्तव्य म्हणजे नुसता खुळचटपणा आहे. त्यामुळे २६ मार्चच्या मोर्चाला परवानगी देऊ नये, मोर्चा थांबवायला पाहिजे, नाहीतर पुन्हा प्रचंड नुकसान होईल.

सरकारचे बोटचेपे धोरण ?

भीमा-कोरेगाव घटनेला २ महिने झाले तरी यावर सरकारने निवेदन का केले नाही. तसेच बंददरम्यान किंवा दंगल काळात झालेल्या नुकसानीची भरपाई सरकार का करत आहे. ज्यांच्यामुळे हे नुकसान झाले त्यांच्याकडून ही भरपाई घ्यावी, अशी मागणी संभाजी भिडे यांनी केली.

कोरेगाव-भीमा प्रकरणात माझी व्यक्तीशा बदनामी झाली. मला बदनाम करणाऱ्यांबद्दल काही तक्रार नाही. या प्रकरणात सरकार बोटचेपे धोरण घेतय की नाही हे मला सांगता येणार नाही, असं संभाजी भिडे म्हणाले. दरम्यान, याप्रकरणाची चौकशी करावी, या मागणीसाठी २८ मार्चला जिल्हा पातळीवर मोर्चा काढू असा इशारा भिडे यांनी दिला.