भाजप सरकार बिल्डर आणि इस्टेट वाल्यांचं सरकार, प्रकाश आंबेडकरांचा टोला

टीम महाराष्ट्र देशा : देशावर सध्या आर्थिक मंदीचे सावट आहे. अनेक ठिकाणी बेरोजगारी वाढत असून मोठ मोठे उद्योगधंदे ठप्प पडले आहेत. तर राज्यातही सारखीच परिस्थिती आहे. यावरून वंचित आघाडी अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. एका आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी भाजप सरकारवर टीका केली आहे.

यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आताच्या सरकारवर कोणाचा विश्वास नाही आणि सरकारचाही कोणावर विश्वास नाही. हे सरकार बिल्डर आणि इस्टेट वाल्यांचं सरकार आहे. ३३००० कुटुंबे देश सोडून गेली आहेत. मात्र सरकार निष्क्रिय आहे. तसेच आर्थिक मंदीमुळे देशातील उद्योग धंदे अडचणीत आले आहेत. तर बांधकाम व्यवसाय पूर्णपणे थंडावला आहे. यासाठी केंद्र सरकारने ४५ लाखांपर्यंत घर खरेदी करण्यावर कर सवलतीच्या निर्णय घेतला आहे. त्यामुळे याचा फायदा बांधकाम व्यवसायाला मिळणार आहे, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या होत्या.

दरम्यान सध्या देश आर्थिक मंदीच्या कचाट्यात सापडला आहे. तसेच देशाचा GDP देखील घसरला आहे. त्यामुळे मागणी आणि पुरवठ्यात कमालीची दरी निर्माण झाली आहे. वाहन निर्मिती उद्योग, वस्त्रोद्योग याला त मंदीचा मोठा फटका सहन करावा लागत आहे. तर या उद्योगांशी संलग्न असलेल्या इतर छोट्या उद्योगांना देखील याचा फटका सहन करावा लागत आहे. वाहन निर्मिती उद्योगाला मोठ्या प्रमाणत कामगारांची गळती लागली आहे. कारण कारखान्यात काम नसल्याने कामगारांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे.