पूरग्रस्तांसाच्या मदतकार्यासाठी मागवलेली हेलिकॉप्टर्स मंत्र्यांनी वापरली

मुंबई : राज्यातील पूरग्रस्तांसाठीच्या बचाव आणि मदत कार्यात सरकारनं हलगर्जीपणा केला असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते विधिज्ज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ते काल मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. धरणांच्या जलाशयांची पातळी वाढल्यानंतरही त्यांची दारं वेळीच उघडली नाहीत आणि नंतर सगळ्या धरणांतून एकाच वेळी पाणी सोडल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली, असं आंबेडकर म्हणाले.

कोल्हापूर, सांगली आणि सातारा भागातील पूरग्रस्तांना स्थानिक जनतेनेच मदतीचा हात दिला. प्रशासनाने मदतकार्यासाठी हेलिकॉप्टर मागितली, पण ती मंत्र्यांसाठी वापरली गेली. सरकारकडून अजूनही पूरग्रस्तांना पाणी, औषधे मिळाली नाहीत. २००५ च्या पुराच्या वेळी ज्या पद्धतीने काँग्रेस सरकार जनतेशी वागली तसेच आताचे सरकार वर्तन करत आहे, असा अरोप करत आंबेडकर यांनी सोमवारी राज्य सरकारचा निषेध केला.

दरम्यान, आतापर्यंत राज्यातल्या पूरग्रस्त भागातल्या चार लाख ६६ हजार ९६३ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे. या नागरिकांसाठी चारशे एक्केचाळीस तात्पुरती निवारा केंद्रं सुरू करण्यात आली आहेत. राष्ट्रीय तसंच राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या तेहतीस पथकांसह सैन्य, नौदल, तटरक्षक दलाची एकूण एकशे अकरा बचाव पथकं अद्यापही या भागात कार्यरत आहेत. या सर्व ठिकाणी वैद्यकीय सेवा कार्यरत असल्याची माहिती राज्य आपत्ती नियंत्रण कक्षातून देण्यात आली आहे.

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातलं पाणी ओसरायला सुरुवात झाली असून, राज्य सरकार तसंच विविध स्वयंसेवी संस्था पूरग्रस्तांसाठी मदतकार्य करत आहेत. कृष्णा, वारणा, पंचगंगा नद्यांना आलेल्या पुरामुळे सांगली बाजारपेठेचं मोठं नुकसान झालं आहे. गेल्या आठ दिवसांपासून बाजारपेठेतली दुकानं पाण्यात आहेत.

कोल्हापूर, सांगलीसह सातारा, ठाणे, नाशिक, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधले ७० तालुके यंदा पूरबाधीत आहेत. यातल्या पूरग्रस्त गावांची संख्या ७६१ इतकी आहे. या सर्व ठिकाणी मदत कार्य मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचं आपत्ती नियंत्रण कक्षानं कळवलं आहे.

महत्वाच्या बातम्या