आरक्षण शाबूत ठेवायचे असेल तर वंचित आघाडीला सत्ता द्या – प्रकाश आंबेडकर

टीम महाराष्ट्र देशा :  सर्व घटकांचं आरक्षण टिकवायचं असेल तर वंचित बहुजन आघाडीच्या हातात सत्ता द्या, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केले.

आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीनेही जोरदार तयारू सुरु केली आहे. याचदरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षणाच्या मुद्यावरून सरकारवर निशाणा साधला. मराठा आरक्षणाला विरोध करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाली आहे. आमचं २७ टक्के आरक्षण संपुष्टात येईल, अशी भीती ओबीसींनाही आहे. लोकांच्या मनातून ही भीती काढण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना कोणताही प्रयत्न करत नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर ओबीसी आणि मराठा आरक्षण शाबूत ठेवायचे असेल तर वंचित बहुजन आघाडीला सत्ता द्या असे आवाहनही त्यांनी केले. तसेच मराठा आणि ओबीसी आरक्षण आम्ही कायद्याच्या चौकटीत राहू देऊ. ओबीसी आरक्षणाला अ आणि मराठा आरक्षणाला ब असा गट दिला असता, तर ओबीसी आरक्षण जाणार नाही यांची भीती निर्माण होणार नाही. ओबीसी आरक्षण शाबूत ठेवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभं राहण्याची गरज आहे, असेही आंबेडकर यांनी म्हंटले.