पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानला दान केले का? प्रकाश आंबेडकर कडाडले

प्रकाश आंबेडकर

टीम महाराष्ट्र देशा : मोदी सरकारच्या कलम ३७० हटवण्याच्या निर्णयावरून अनेक नेत्यांच्या प्रतिक्रया येत आहेत. या प्रतिक्रिया  सकारात्मक आणि नकारात्मक स्वरूपाच्या आहेत. यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. सरकारने कलम ३७० मध्ये बदल करुन जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढून टाकला आहे. मात्र, पाकव्याप्त काश्मीर आता पाकिस्तानला दान दिल का ? असा सवाल केला आहे. ते नागपूर येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी आंबेडकरांनी मोदी सरकारच्या निर्णयाचा विरोध केला आहे. तर कलम ३७० मुळे काश्मीरी जनता भारताला मनाने जोडली गेली होती, मात्र आता तो बंध देखील तोडला आहे, असे ते म्हणाले. तसेच आंतरराष्ट्रीय नियंत्रण रेषेबाबत अस्पष्टता आहे. भारताने शिमला करार किंवा त्या आधीच्या करारात आंतरराष्ट्रीय नियंत्रण रेषा मान्य केलेली नाही. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीर आता पाकिस्तानला दान दिलं का ? याचा खुलासा केंद्र सरकारने करावा, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

दरम्यान, जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं घटनेतलं ३७०वं कलम रद्द करण्याच्या विधेयकाला राष्ट्रपति रामनाथ कोविंद यांनी काल मंजुरी दिली. यामुळे आता जम्मू काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आले आहे. कलम ३७० हटवणे हे मोदी सरकारचा लोकसभा निवडणुकीतला अजेंडा होता. त्यामुळे आपल्या दुसऱ्या कार्यकाळात येताच हा जम्मू काश्मीरचा प्रश्न कलम ३७० हटवून निकाली काढला.