भाजप–राष्ट्रवादीचे साटेलोटे;राष्ट्रवादीने जाणीवपूर्वक भंडारा-गोंदियात कमी क्षमतेचा उमेदवार दिला

Prakash ambedkar

टीम महाराष्ट्र देशा : राज्याच्या दृष्टिकोनातून भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्र महत्त्वाचा मतदार संघ आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यामधील साटेलोटे बघता राष्ट्रवादीने तिथे जाणीवपूर्वक कमी क्षमतेचा उमेदवार दिला आहे, असा खळबळजनक आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. भारिप बहुजन महासंघाने या निवडणुकीसाठी पक्षाचे आदिवासी नेते एल.के. मडावी यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या प्रचारार्थ आयोजित पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर बोलत होते.

नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकारणाला कंटाळून भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत निवडणूक लढण्याचा त्यांचा पहिला अधिकार आहे. म्हणूनच आम्ही त्यांना पाठिंबा दिला होता. मात्र ही जागा राष्ट्रवादीकडे गेल्यामुळे आणि भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये साटेलोटे असल्याने तिथे कमी क्षमतेचा उमेदवार दिला गेला. दोन्ही पक्षांनी मिळून नाना पटोले यांचे राजकारण संपविले. नाना पटोले यांना उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांना आम्ही भारिप बहुजन महासंघाच्या वतीने निवडणूक लढण्याचे आमंत्रण दिले होते मात्र त्यांसाठी ते तयार झाले नाहीत. असा दावा देखील प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.