प्रकाश आंबेडकरांनी वाढवली सुशीलकुमार शिंदे यांची डोकेदुखी

सोलापूर – ( सुर्यकांत आसबे ) – सोलापूर लोकसभा मतदार संघातून बहुजन वंचित आघाडीकडून प्रकाश आंबेडकर निवडणूक लढविणार आहेत.स्वतः त्यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे.आंबेडकर सोलापूर लोकसभा लढणार असल्याने माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची डोकेदुखी वाढणार असल्याचे स्पष्ठ झाले आहे.

सोलापूर जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीची ताकद गेल्या वर्षभरात वाढली आहे . हे पाहता याचे प्रवर्तक  प्रकाश आंबेडकर यांना कार्यकर्त्यांकडून सोलापूर लोकसभा निवडणूक लढविण्याचा आग्रह होत होता. त्यानुसार त्यांनी सोमवारी सकाळी अकोला येथे पत्रकार परिषद घेवून सोलापूरमधून उभे राहण्याचा इरादा व्यक्त पक्का केला आहे. दरम्यान आंबेडकर जर सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे राहिले तर याचा फटका काँग्रेस नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना बसू शकतो असे राजकीय जाणकारांचे मत आहे.

दरम्यान आंबेडकर यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे स्पष्ट संकेत दिल्याने आता ते काँग्रेस आघाडीत सहभागी होणार की नाही ? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. आंबेडकर यांचा पारंपारिक मतदारसंघ हा अकोला असून तेथून ही ते लढणार का ? हा प्रश्‍न आहे. एकाच वेळी दोन लोकसभा मतदारसंघातून ते लढतील असा ही अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान बहुजन वंचित आघाडीशी काँग्रेसची चर्चा सुरू असली तरी दुसरीकडे  आंबेडकर यांनी राज्यात २२ ठिकाणी आपले उमेदवार ही जाहीर केले आहेत. आता तर त्यांची आपल्या सोलापूरच्या उमेदवारीचे ही स्पष्ट संकेत दिल्याने काँग्रेस पक्ष पुरता हैराण झाला आहे.

सुशीलकुमार शिंदे देशातील काँग्रेस पक्षाचे मोठे नेते आहे. त्यांच्याच मतदारसंघातून आंबेडकर यांनी निवडणूक लढण्याचा इरादा जाहीर केल्यानंतर आता काँग्रेसही सावध झाली आहे. बहुजन वंचित आघाडीची स्थापना ही सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरमध्ये झाली आहे. यास मोठा प्रतिसाद मिळाला आहे. सोलापूर, मंगळवेढा, पंढरपूर, माळीनगर या भागात मोठ्या सभा झाल्या आहेत. आंबेडकर यांची सोलापूरची सभा तर रेकॉर्ड ब्रेक होती. याच वेळी त्यांना कार्यकर्त्यांनी सोलापूर लोकसभा निवडणूक लढविण्याचा आग्रह केला होता व तो आजही कायम आहे.
आंबेडकर यांनी शेजारच्या माढ्या मतदारसंघात विजयराव मोरे यांची उमेदवारी जाहीर केली असून त्यांच्या प्रचारास सुरूवात झाली आहे. मोरे हे ग्रामीण भागात रोज दौरे करत आहेत. माढ्यातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माघार घेतल्याने राष्ट्रवादीचा उमेदवार कोण याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूर लोकसभा लढविणार असल्याची घोषणा करताच कार्यकर्त्यांनी चार हुतात्मा पुतळा येथे जल्लोष करून आंबेडकर यांच्या उमेदवारीचे स्वागत केले आहे.

1 Comment

Click here to post a comment