fbpx

भीम आर्मीच्या हिंसाचाराला प्रकाश आंबेडकरांचा विरोध, कार्यकर्त्यांना संयमाचं आवाहन

prakash aambedkar

टीम महाराष्ट्र देशा : सोलापुर मतदार संघातून प्रकाश आंबेडकर यांचा पराभव झाल्यास भाजपचं एकही कार्यालय ठेवणार नाही. भीम आर्मीच्या या आक्रमक भूमिकेला प्रकाश आंबेडकर यांनी विरोध केला आहे. तर भिम आर्मीचा हिंसाचार आम्हाला मान्य नाही, कार्यकर्त्यांनी बळी पडू नये असे आवाहनही त्यांनी केले आहे.

संपूर्ण देशाला २३ मे ला लागणाऱ्या निकालाची प्रतीक्षा आहे. देशात कोण सत्ता स्थापन करणार याची उत्सुकता लागलेली आहे. दरम्यान प्रसार माध्यमांनी दिलेल्या एक्झिट पोल नुसार महाराष्ट्रात महायुती सरासरी ३० ते 40 जागा तर कॉंग्रेस – राष्ट्रवादी आघाडी सरासरी ७ ते १२ जागा मिळवणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला एकही जागा मिळणार नसल्याचे प्रसार माध्यमांच्या एक्झिट पोल मध्ये दर्शविण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुकीत सोलापुर मतदार संघातून प्रकाश आंबेडकर यांचा पराभव झाल्यास भाजपचं एकही कार्यालय ठेवणार नाही. शिवाय राज्यात भाजपच्या नेत्यांना फिरु देखील देणार नाही. अशी धमकी भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रदेश प्रमुख अशोक कांबळे यांनी पत्रकाद्वारे दिली होती.

दरम्यान भीम आर्मीच्या या धमकीला प्रकाश आंबेडकरांनी विरोध केला आहे. उद्या निवडणुकीचे निकाल काहीही आले, तरी हिंसाचार होणार नाही ह्याची काळजी घ्या. भिम आर्मीचा हिंसाचार आम्हाला मान्य नाही, कार्यकर्त्यांनी त्याला बळी पडू नये. असे आदेशही त्यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत.