एखाद्या नेत्याचे कौतुक करणे म्हणजे युती नव्हे – अमित शाह

नवी दिल्ली – जनता दल सेक्यूलरचे देवेगौडा यांचे मोदींनी एका जाहीर सभेत कौतुक केल्याने, कर्नाटकमध्ये भाजपा आणि माजी पंतप्रधान देवेगौडा यांच्या जनता दल सेक्यूलरची युती होणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी या गोष्टीचं खंडन करतांना एखाद्या नेत्याचे कौतुक करणे म्हणजे त्याच्याशी युती करणे असं होतं नसल्याचं त्यांनी म्हंटल. ते एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

अमित शहा म्हणाले की, देवेगौडा हे ज्येष्ठ नेते असून त्यांचे मोदींनी कौतुक केले. पण एखाद्याचे जाहीर कार्यक्रमात कौतुक करणे म्हणजे युती होत नाही. भाजपाचे राजकीय विचार इतके संकुचित नाहीत. देवेगौडा यांचा पक्ष भाजपाची बी टीम असल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जात आहे. दुसरीकडे मोदींनीही देवेगौडांचे कौतुक केले, हे नेमकं काय सुरु आहे, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर अमित शहा म्हणाले, तुम्ही मोदींचे म्हणणे पूर्णपणे समजून घेतले नाही. देवेगौडा हे ज्येष्ठ नेते आहेत आणि मी त्यांचा आदर करतो, असे मोदींनी म्हटले आहे.

राहुल गांधींसारखा युवा नेता देवेगौडा यांचा अपमान करतो, याकडे मोदींनी लक्ष वेधले होते. पण मोदींनी देवेगौडा यांचे कौतुक केले, इतकंच वारंवार सांगितले जाते, असे अमित शहा यांनी नमूद केले. कर्नाटकमध्ये भाजपाला युतीची गरज पडणार नाही. आम्ही बहुमताने सत्तेत येणारच असा दावाही त्यांनी यावेळी केला.