“आज नंबर ‘७’ने जर्सी नंबर ‘७’ची आठवण करून दिली”

“आज नंबर ‘७’ने जर्सी नंबर ‘७’ची आठवण करून दिली”

dhoni - chahar

नवी दिल्ली : भारताची ‘युवा’ टीम सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. शिखर धवनच्या नेतृत्वात आणि राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारताने आपली विजयी घौडदौड कायम ठेवली आहे. टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात तीन विकेटने विजय मिळवला आहे. दुसरा सामना जिंकत टीम इंडियाने मालिकाही खिशात घातली आहे.

भारताला विजयासाठी 276 धावांची गरज असताना पहिल्या आणि मधल्या फळीतील आघाडीचे बॅट्समन स्वस्तात माघारी परतले. 193 धावांवर सात विकेट्स असताना विजयाची आशा मावळली होती. हातात ३ विकेट्स असताना ८३ धावांची गरज होती. अशात दीपक चाहर आणि भुवनेश्वर कुमारने केलेली भागीदारी ही निर्णायक ठरली. या दोन्ही खेळाडूंनी संयमी खेळी केली आणि श्रीलंकेच्या घशातून हा विजय खेचून आणला.

सातव्या क्रमांकावर खेळायला आलेल्या दीपक चाहरने 82 चेंडूत 69 धावांची तडाखेबंद खेळी करून अशक्य वाटणारा विजय खेचून आणल्यानंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. भारताचा माजी फिरकीपटू प्रज्ञान ओझा याने देखील दीपकवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

भारतीय संघाचे 7 फलंदाज बाद झाले होते आणि संघाला ५५ चेंडूत ६१ धावांची गरज असताना ओझाने ट्विट करत माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची आठवण येत असल्याचे सांगितल होत. ‘धावांचा पाठलाग करत असताना आज नंबर 7 मला जर्सी नंबर 7 ची आठवण करून देत आहे. आशा करतो भारत विजय मिळवेलच’. अशा आशयाचे ट्विट प्रज्ञान ओझा याने केले होते. आणि अखेर उपकर्णधार भुवनेश्वर कुमार आणि दीपक चाहरच्या जोडीने भारताला विजय मिळवून दिला. त्यानंतर आता प्रज्ञान ओझाचे हे ट्विट तुफान व्हायरल होत आहे.

दरम्यान, सलामीवीर पृथ्वी शॉ (12) तिसऱ्याच षटकात बाद झाला. त्यापाठोपाठ इशान किशन (1), शिखर धवन (29), मनिष पांडे (37) हार्दिक पंड्या (0) हे काही अंतराने एकामागे एक तंबूत परतले. तर दुसऱ्याबाजूला सूर्यकुमार यादवने एक बाजू लावून धरली होती. त्याने 42 चेंडूत 52 धावा फटकावत एकदिवसीय कारकीर्दीतलं पहिलंवहिलं अर्धशतक झळकावलं. त्यानंतर आलेल्या कृणाल पांड्याने देखील 35 धावांचं योगदान दिलं.

कृणाल नंतर संघाच्या मदतीला योग्य वेळी धावून आला तो दीपक चाहर ! त्याने 82 चेंडूत 69 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 7 चौकार आणि 1 षटकार फटकावला. भुवनेश्वर कुमारने (19) त्याला अखेरपर्यंत महत्वपूर्ण साथ दिली. या सामन्यानंतर दीपकचे चांगले कौतुक केले जात आहे.

महत्वाच्या बातम्या