fbpx

‘प्रकाश आंबेडकर यांना संघाची कावीळ झाली आहे’

Prakash ambedkar

पुणे : कोरेगाव भीमा येथील पूजा सकट या मुलीचा मृतदेह रविवारी विहिरीत आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. आता पूजाच्या मृत्युवरून राजकारण सुरु झालं आहे. पूजा सकटचा मृत्यू संशयास्पद असल्याचा दावा भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. यावर आता भाजपकडून प्रतिक्रिया आली आहे. पूजा सकट मृत्यू प्रकरणाबद्दल सर्वांनाच संवेदना आहेत मात्र यामागे संघाचा हात असल्याचा दावा करणे म्हणजे प्रकाश आंबेडकरांकडून ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रकार सुरू आहे.याचबरोबर प्रकाश आंबेडकर यांना संघाची कावीळ झाली असल्याचा टोला भाजपचे माजी खासदार प्रदीप रावत यांनी लगावला आहे. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

कोरेगाव भीमा येथे झालेला हिंसाचार हा माओवादी विचारांच्या संघटना,खोटा इतिहास पसरवून जातीय तेढ निर्माण करणाऱ्या फुटीरतावादी गट याचा पूर्वनियोजित कट होता,यात आंबेडकरी व हिंदुत्ववादी गटाचा यामध्ये काहीही संबंध नाही, असा अहवाल पुण्यात सत्यशोधन समितीने पत्रकार परिषदेत सादर केला आहे.

कोरेगाव भीमा येथील पूजा सकट या मुलीचा मृतदेह रविवारी विहिरीत आढळल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. १ जानेवारीला येथे दंगल झाली होती. दंगलीच्या वेळी घर पेटवण्याच्या प्रकाराचा संदर्भ या घटनेशी लावण्यात येत आहे.माझ्या मुलीने आत्महत्या केली नसून तिचा खून करून मृतदेह विहिरीत टाकून देण्यात आला, असा दावा मुलीच्या वडिलांनी केला आहे. दरम्यान पूजा सकटचा मृत्यू संशयास्पद आहे. कोरेगाव-भीमा प्रकरणात पूजा एकमेव तक्रारदार होती. पोलिसांनी आधीच तिच्या एफआयआरवर तपास केलेला नाही. आता तिच्या मृत्यूप्रकरणी तरी पोलिसांनी निष्पक्ष तपास करावा, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

पुण्यातील कोरेगाव भीमामध्ये 1 जानेवारीला हिंसाचार झाला होता. जाळपोळ आणि दगडफेकही झाली होती. या हिंसाचारात पूजा सकटचं घर जाळण्यात आलं होतं. हिंसाचाराच्या त्या घटनेची पूजा साक्षीदार होती.घर जाळल्यानंतर पूजाचं कुटुंब कोरेगाव-भीमापासून जवळच असलेल्या वाडा नावाच्या गावात राहायला गेलं. मात्र वाडा गावात ज्या ठिकाणी हे कुटुंब राहत होतं, तिथल्या जमीन मालकाने काही दिवसांमध्येच घर सोडण्यासाठी तिच्या कुटुंबाच्या मागे तगादा लावला.पूजा शनिवारी घरातून नाहीशी झाली. रविवारी तिचा मृतदेह वाडा गावातील एका विहिरीत आढळून आला.