चंद्राबाबू नायडू यांच्या उपोषणाला मिळणार पॉवर

टीम महाराष्ट्र देशा – आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात आज सकाळी एक दिवसाच्या उपोषणाला प्रारंभ केला आहे. आंध्रला विशेष राज्याचा दर्जा मिळावा यासाठी त्यांनी उपोषणाचा मार्ग निवडला आहे. आंध्र भवनमध्ये त्यांनी सकाळी ८ वाजता उपोषणाला प्रारंभ केला आहे. उपोषणाला प्रारंभ करण्यापूर्वी नायडूंनी राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पावर यांनी चंद्राबाबू नायडू यांच्या उपोषणाला आंध्र भवनमध्ये भेट देऊन पाठींबा दर्शविला आहे. त्यासोबतच आंध्रला विशेष राज्याचा दर्जा मिळावा यासठी त्यांच्या सोबत चर्चा केली.

आंध्राला विशेष राज्याचा दर्जा देण्यात यावा तसेच राज्याची निर्मिती करण्यात आली त्यावेळी जी वचने देण्यात आली होती, ती पूर्ण करण्यात यावीत अशी मागणी त्यांनी केली आहे. आंध्रचे विभाजन झाल्याने तसेच विभाजनावेळी आंध्रावर अन्याय झाल्याने चंद्राबाबू नायडू यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला रामराम केला होता. तेलुगू देसम पक्षाने दिलेल्या माहितीनुसार उपोषण रात्री ८ वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. उद्या ते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निवेदन सुद्धा देणार आहेत.