fbpx

पिंपरीच्या औद्योगिक परिसरातील वीजपुरवठा सुरळीतच

पुणे : मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीचे कामे तसेच वीजयंत्रणेत केलेले बदल व सुधारणांमुळे कुदळवाडी, ज्योतिबानगर, रुपीनगर, तळवडे, भोसरी एमआयडीसीमधील टी ब्लॉक, सेक्टर 10 या ठिकाणी सुरळीत व योग्य दाबाने वीजपुरवठा सुरु आहे.

देखभाल व दुरुस्तीची कामे केली नसल्याने वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असल्याची माहिती चुकीची असून उद्योगांच्या वीजविषयक तक्रारींचे निवारण करण्यासाठी महावितरणकडून 24×7 सेवा देण्यात आहे. तसेच यासाठी स्वतंत्र वाहन व तांत्रिक कर्मचाऱ्यांची  नियुक्ती करण्यात आली आहे.

भोसरी विभाग अंतर्गत एकूण 22 वीजवाहिन्यांद्वारे कुदळवाडी, ज्योतिबानगर, रुपीनगर, तळवडे तसेच भोसरी एमआयडीसीला वीजपुरवठा करण्यात येतो. या सर्व वाहिन्यांच्या देखभाल व दुरुस्तीचे काम पावसाळ्यापूर्वीच करण्यात आलेले आहेत. यामध्ये रोहित्राची तपासणी, त्याचे अर्थिंग व टर्मीनल कनेक्शन चेक करणे, ऑईलची पातळी कायम ठेवणे, फिडर पिलरची दुरुस्ती करणे, वीजतारांजवळील झाडांच्या फांद्याची छटाई, डिस्ट्रीब्यूशन बॉक्समधील फ्यूज बदलविणे, खांब आणि तारांचे मजबुतीकरण, गंजलेले वीजखांब बदलणे, वीजतारांमध्ये स्पेसर्स बसविणे, इन्सूलेटर बदलणे, तारा बदलणे किंवा झोल काढणे, जुन्या फिडर पिलरमध्ये इन्सूलेशन स्प्रे मारणे तसेच पावसाचे पाणी साचणाऱ्या परिसरातील फिडर पिलरची जमिनीपासून उंची वाढविणे आदी कामांचा समावेश आहे. यासोबतच उपकेंद्गातील ब्रेकर्सची दुरुस्ती, बॅटरी चार्जींग, अर्थींग, पॉवर टॉन्सफॉर्मरचे ऑईल फिल्टरेशन, रिले टेस्टींग, ग्रिसींग, इन्सूलेटर क्लिनींग आदी कामे करण्यात आली आहेत.

याशिवाय ज्योतिबानगर, रुपीनगर, तळवडे परिसराला वीजपुरवठा करणाऱ्या  22 केव्ही यमुनानगर वीजवाहिनीचे विभाजन करण्यात आले असून त्यावरील काही वीजभार हा बजाज वीजवाहिनीवर देण्यात आला आहे. तसेच नवीन 22/22 इंद्गायणी स्विचिंग स्टेशनमधून 22 केव्ही तळवडे वीजवाहिनी कार्यान्वित करण्यात आल्याने तळवडे परिसरात सुद्धा वीजपुरवठा सुरळीत व योग्य दाबाने होत आहे. भोसरी उपविभागातील 22 केव्ही पवना वाहिनीचे विभाजन करण्यात आले आहे व नवीन 22 केव्ही प्रियदर्शनी वाहिनी कार्यान्वित करण्यात आली आहे. तसेच सेक्टर 7 मध्ये 500 मीटर केबल टाकून वाहिनी क्र 1 चा वीजभार कमी करण्यात आला आहे.

मान्सूनपूर्व तसेच नियमित देखभाल व दुरुस्तीच्या कामांमुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहेत. गेल्या दि. 1 ते 18 जुलैदरम्यान ज्योतिबानगर, रुपीनगर व तळवडे परिसरात तांत्रिक बिघाडांमुळे तीन वेगवेगळ्या कालावधीत एकूण 2 तासांसाठी वीजपुरवठा खंडित झाला होता. तर भोसरी एमआयडीसीमधील 14 पैकी एकूण 9 वीजवाहिन्यांद्वारे होणारा वीजपुरवठा दि. 1 ते 18 जुलै दरम्यान मुसळधार पाऊस तसेच इतर विविध तांत्रिक बिघाडांमुळे वेगवेगळ्या कालावधीत एकूण 40 तास खंडित होता. ही वस्तुस्थिती असल्याने कुदळवाडी, ज्योतिबानगर, रुपीनगर, तळवडे, भोसरी एमआयडीसीमधील टी ब्लॉक, सेक्टर 10 या ठिकाणी सुरळीत व योग्य दाबाने वीजपुरवठा सुरु आहे व खंडित वीजपुरवठ्यासंदर्भात देण्यात आलेली माहिती चुकीची आहे.