fbpx

थकबाकीदारांविरोधात सुरु असलेली वसुलीची व वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम आणखी कठोर होणार

पुणे : पुणे व पिंपरी शहरांसह ग्रामीण भागात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांकडे गेल्या काही महिन्यांपासून थकबाकी वाढत असून ही अतिशय गंभीर बाब आहे व ती सहन केली जाणार नाही. त्यामुळे थकबाकीदारांविरोधात सुरु असलेली वसुलीची व वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम आणखी कठोर करावी, असे निर्देश महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांनी दिले.

गणेशखिंड येथील ‘प्रकाशभवन’मध्ये बुधवारी (दि. 5) आयोजित पुणे परिमंडलाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रादेशिक संचालक श्री. ताकसांडे म्हणाले, की प्रामुख्याने घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांच्या चालू महिन्याच्या वीजबिलांसोबतच मागील थकीत वीजबिलांची 100 टक्के वसुली करण्यासाठी सुरु असलेली मोहीम आणखी कठोरपणे राबविणे आवश्यक आहे. कंत्राटदारांच्या मीटर रिडींग घेण्याच्या कामाचे पर्यवेक्षण करण्यासाठी महावितरणचे अधिकारी व कर्मचारी यांना दरमहा 5 टक्के रिडींग घेण्याचे निर्देश आहेत. त्याप्रमाणे या कामाची चोखपणे अंमलबजावणी करण्यात यावी. सध्या पुणे परिमंडलात नवीन वीजजोडण्यांसाठी वीजमीटर पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून पेडपेडींग असणार्‍या ग्राहकांना ताबडतोब नवीन वीजजोडणी देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश प्रादेशिक संचालक श्री. ताकसांडे यांनी यावेळी दिले. सध्या 89 टक्के घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी झालेली आहे. डिसेंबर महिन्याअखेर या संपूर्ण वीजग्राहकांच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली.

या बैठकीला अधीक्षक अभियंता सर्वश्री पंकज तगलपल्लेवार, राजेंद्र पवार, शंकर तायडे, उत्क्रांत धायगुडे, विजय भाटकर, वादिराज जहागिरदार, उपमहाव्यवस्थापक (आयटी) श्री. एकनाथ चव्हाण आदींसह परिमंडलातील सर्व कार्यकारी अभियंता, उपविभाग कार्यालयप्रमुख तसेच लेखा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

वीजयंत्रणेच्या मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीचे कामे महिन्याअखेर पूर्ण करण्याचे निर्देश