वीज तोडणीचा वाद, अभियंत्याकडून जिवाला धोका असल्याची कर्मचाऱ्याची तक्रार

mahavitaran

बीड : परळी येथील महावितरणच्या उपकार्यकारी अभियंता प्रशांत आंबाडकर यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कर्मचारी तंत्रज्ञ गोपाळ काकडे यांनी सहाय्यक अभियंता यांच्याकडे याबाबत तक्रार दिली आहे. आंबाडकर यांच्याकडून जिवाला धोका असल्याचे त्यात म्हटले आहे.

तक्रारीत म्हटले आहे की, आमच्या कार्यालयाचे उपकार्यकारी अभियंता प्रशांत आंबाडकर माझा सतत मानसिक छळ करुन जाणीवपूर्वक त्रास देत आहेत. त्यांच्या तोंडी व लेखी आदेशानुसार माझ्या कार्यक्षेत्रात दिलेल्या थकबाकीची वसूली प्रामाणिकपणे करत आहे. माझ्या कार्यक्षेत्रात एका ग्राहकाकडे पाच लाखाच्या वर थकबाकी असल्याने त्यांच्या आदेशानुसार वीज खंडित केली.

पण आंबाडकर यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता त्याच दिवशी दुसऱ्या कर्मचाऱ्याला बोलावून खंडित केलेली विज जोडून दिली. विशेष म्हणजे या ग्राहकाने विजबील थकबाकी भरलेली नाही. या घटनेची वरिष्टांना माहिती दिल्याने आंबाडकरांनी मला धमकी दिली आहे. यामुळे माझ्या जिवीतास धोका असून वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्यासाठी लेखी तक्रार करत आहे. असे गोपाळ काकडे यांनी वरिष्ठांना दिलेल्या तक्रारी मध्ये सांगितले आहे. याची प्रत तहसीलदार, अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता यांना पाठवण्यात आली आहे.

राज्य सरकारने वीज बील वसूली मोहीम सुरू केली आहे. मात्र वीजबिल वसूलीच्या नावाखाली व्यापारी, राजकारणी लोकांचे विजबील पेंडींग असताना दिवसा विज खंडित करण्यात येते. रात्री आंबाडकर दुसऱ्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून ही खंडित केलेली विज पुन्हा जोडून देण्यात येते. यामागे अर्थकारण दडल्याची चर्चा सुरू आहे.

महत्त्वाच्या बातम्या