चुकीच्या लोकांच्या हातात सत्ता गेल्याचं पटवून दिलं तरच सत्तांतर घडून येईल : पवार

टीम महाराष्ट्र देशा – इंधन दरवाढीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. हे सरकार जनविरोधी असल्याचं लोकांना पटवून दिलं पाहिजे. चुकीच्या लोकांच्या हातात सत्ता गेल्याचं पटवून दिलं तरच सत्तांतर घडून येईल असं मत पवार यांनी दिल्लीत बोलताना व्यक्त केलं आहे.

प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेससह देशात विरोधकांनी पुकारलेल्या भारत बंदला देशभरातून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजधानी दिल्लीमधील रामलीला मैदानावरून मोदी सरकावर तोफ डागताना चौफेर हल्ला केला. यावेळी १६ विविध पक्षांचे नेते उपस्थित होते. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, वरिष्ठ काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्यासह दिग्गज नेते यावेळी उपस्थित होते.

सामान्य माणसांना दिलासा देण्यासाठी जी पावलं उचलायला हवी होती, ती उचलली गेली नाहीत. सध्याचं सरकार जनविरोधी असून चुकीच्या लोकांच्या हातात सत्ता गेल्यानेच जनतेच्या मनात रोष निर्माण झाला आहे, अशी जोरदार टीका शरद पवार यांनी केली.