fbpx

37 हजार शेतक-यांच्या कृषी पंपाची वीज तोडल्याने शेतकरी संकटात

Power Cut of Agriculture Pumps

अहमदनगर : नगर जिल्ह्यात बहुतांश शेतक-यांनी वीज बिलाची थकबाकी जमा करण्याकडे दुर्लक्ष केले असल्याने आता अखेरीस महावितरण वीज कंपनीने पुन्हा एकदा थकबाकीदार शेतक-यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. महावितरणाने जिल्ह्यात तब्बल 37 हजार शेतक-यांच्या कृषी पंपांचा वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई केली आहे.

यंदाच्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने शेतीसाठी पाणी देखील मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. त्यामुळे शेतक-यांनी मोठ्या उमेदीने आपल्या शेतांमध्ये पिके घेतली आहेत. मात्र आता महावितरण कंपनीने थकबाकी वसूल करण्यासाठी वीज पुरवठा खंडित केल्याने शेतकरी संकटात सापडले असून गहू, हरभरा, ज्वारी, अशी पिके देखील धोक्यात येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी संतप्त होतांना दिसत असून जागोजागी शेतकरी रस्त्यावर उतरून महावितरण च्या विरोधात आंदोलने करीत आहे.

अहमदनगर जिल्ह्यात 3 लाख 57 हजार शेतक-यांच्या कृषी पंपांना महावितरणाने वीज पुरवठा केला असून वीज बिलाची थकबाकी तब्बल 2 हजार 250 कोटींपेक्षा जास्त झाली आहे.वारंवार शेतक-यांना थकबाकी जमा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. तसेच शेतक-यांसाठी राज्य सरकारने कृषी संजीवनी योजना देखील सुरू केली होती. या योजनेनुसार शेतक-यांना वीज बिलाचे हप्ते पाडून ते एक वर्षात जमा करण्याची संधी देण्यात आली होती. शेतक-यांना मार्गदर्शन करण्यासाठी महावितरणाने शिबिरांचे देखील आयोजन केले होते.

कृषी संजीवनी योजनेला नोव्हेंबर अखेरपर्यंत मुदत देण्यात आली होती.या मुदतीत जिल्ह्यातील 88 हजार शेतकरी संजीवनी योजनेत सहभागी झाले. त्यामुळे जवळपास 35 कोटी 15 लाख रूपयांची थकबाकी जमा देखील झाली. मात्र 2 लाख 69 हजार शेतकर्यांकडे अद्यापही 2 हजार 250 कोटी रूपयांची थकबाकी वसूल करायची आहे. कृषी संजीवनी योजनेला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने महावितरण वीज कंपनीने 1 डिसेंबर पासून कारवाईचा बडगा उगारला आहे.

आतापर्यंत मागील 26 दिवसांमध्ये महावितरण ने 37 हजार शेतक-यांच्या कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई केली आहे. चांगला पाऊस झाल्याच्या पार्श्वभूमीवर उत्साहित शेतक-यांनी रबी हंगामासाठी जोरदार तयारी केला आहे. शेतक-यांनी आपल्या शेतांमध्ये गहू,ज्वारी,हरभरा अशी पिकांची लागवड केली असून पिके देखील सध्या जोमात आहेत.

मात्र, आता वीज पुरवठाच बंद झाल्याने शेती साठी पाणी देखील उपलब्ध होणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतांमधील उभी पिके आता धोक्यात येण्याची शक्यता असून शेतक-यांमध्ये महावितरणच्या विरोधात तीव्र संताप निर्माण होतांना दिसत आहे. शेतीसाठी लवकर पाणी उपलब्ध झाले नाही तर शेतकर्यांचा मोठ्या प्रमाणावर उद्रेक होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.