मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा एक महिना पुढे ढकलल्या

मुंबई: मुंबई विद्यापीठाने तब्बल ३० अभ्यासक्रमांच्या परीक्षा एक महिना पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थांना त्रासाला सामोरे जाव लागणार आहे. यापूर्वी देखील वेळेवर निकाल न लावल्यामुळे मुंबई विद्यापीठ चांगलेच चर्चेत आले होते. विद्यापीठाकडून या परीक्षांचे नवे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

विद्यापीठाच्या विज्ञान शाखेतील एमएससी (सेमिस्टर 1, सेमिस्टर 3), वाणिज्य शाखेतील बीकॉम (सेमिस्टर 5, सेमिस्टर 6) एमएमएम (सेमिस्टर 1) एमएचआरडीएम, एमएफएम, एमएफएसएम, तर कला शाखेतील एमए, बीए, एमएडच्या परीक्षा एक ते दीड महिना पुढे ढकलल्या आहेत.

या अगोदरच्या सेमिस्टरचे निकाल आताच लागले आहेत, तर काही परीक्षांचे निकाल पुढील आठवड्यात लागणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना काही वेळ मिळावा, नव्या परीक्षांसाठी तयारीची संधी मिळावी, यासाठी परीक्षा पुढे ढकलल्याचं विद्यापीठाने सांगितले आहे.